पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रक्षाळ पूजेने नित्योपचारास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:13 PM2018-08-03T12:13:05+5:302018-08-03T12:15:24+5:30
आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळ पूजेचा उत्सव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहात होतो.
पंढरपूर : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजेनंतर नित्योपचारास प्रारंभ झाला. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान करण्यात आले़ त्यानंतर खास पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळ पूजेचा उत्सव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहात होतो़
आषाढी यात्रेमध्ये भक्तांना २४ तास दर्शन देऊन थकलेल्या विठ्ठलाचा थकवा किंवा शिणवटा जावा म्हणून परंपरेनुसार विठुरायाला रात्री गवती चहासह विविध प्रकारचे पंधरा ते सोळा पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला.
आषाढी व कार्तिकी यात्रेच्यावेळी लाखोंच्या संख्येने भक्त येतात. येथे येणाºया प्रत्येक वारकºयांना विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी विठुराया हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूपारती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंग देखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन विठ्ठलाला देखील थकवा आलेला असतो.
विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळ पूजेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो, अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार १ आॅगस्ट रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालून मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील कर्मचाºयांकडून विठ्ठलाला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी देवाला आकर्षक पोशाख परिधान करुन पारंपरिक अशा विविध अलंकारांनी सजविण्यात आले. सायंकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धूपारतीचा कार्यक्रम झाला.
या अगोदर यात्रेमुळे काढण्यात आलेला विठ्ठलाचा पलंग देखील शयनघरात पूर्ववत लावण्यात आला. प्रक्षाळ पूजेनंतर मंदिरातील विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू झाले.
पंधरा पदार्थांपासून बनविण्यात येतो काढा
- विठ्ठलाचा थकवा दूर व्हावा, यासाठी देवाला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदामबी, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात येत असतो. हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवाटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगितले जाते.