आठवड्यात टँकर सुरू करा
By admin | Published: May 6, 2014 05:52 PM2014-05-06T17:52:55+5:302014-05-06T20:45:41+5:30
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला.
सांगोला : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला. यासाठी शासन पैसा खर्च करते. पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवकांची असून पाणीटंचाईची एकत्रित पाहणी करून संबंधित अधिकार्यांनी टॅँकरचा प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे पाठविल्यानंतर एका आठवड्यात टॅँकर सुरू झाले पाहिजेत, अशा सूचना आमदार गणपतराव देशमुख यांनी टंचाई आढावा बैठकीत प्रशासनाला केल्या. सांगोला येथे पंचायत समिती बचत भवनात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. दीपक साळुंखे, सभापती ताई मिसाळ, उपसभापती पांडुरंग पांढरे, चंद्रकांत देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पं. स. सदस्या यमगर, सूर्यागण, सुनील चौगुले, सुबराव बंडगर, हणमंत बंडगर, नवनाथ पवार, शहाजी नलवडे, पांडुरंग जाधव, कार्यालयीन प्रमुख सुभाष पवार, नगरसेवक नवनाथ पवार, जि. प. सदस्य किसन कोळेकर, बिरा गेजगे, सदस्या सुरेखा सूर्यागण, उपअभियंता महारुद्ध अंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मिलिंद देशपांडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, शिरभावी पाणीपुरवठा उपविभागीय अधिकारी विजय नलवडे उपस्थित होते. जेथे पाणीपुरवठा योजना राबविण्याची आहे त्या गावामध्ये शौचालय योजना प्राधान्याने राबवावी. ग्रामपंचायतीने गावातील पाणंद रस्ते रोजगार हमीतून येत्या पावसाळ्यापर्यंत करून घ्यावेत. जनावरांच्या छावण्या चालविलेल्या छावणी चालकांची आॅगस्ट, सप्टेंबर २०१३ अखेरपर्यंतची बिले सात दिवसांत अदा करावीत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. गावातील रस्त्यांच्या कामाचा आढावा आठ दिवसांत सादर करावा. शिरभावी पाणीपुरवठा योजनेची गळती पाच टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा. विंधन विहिरी बंद आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी पंचायत समिती फंडातून खर्च करावा, असे आ. देशमुख म्हणाले. गावागावांतील पाणीटंचाईवर ग्रामसेवक, तलाठ्यांनी लक्ष देऊन टॅँकर मागणी प्रस्ताव त्वरित सादर करावा. ५० विंधन विहिरी बंद आहेत. त्या सुरू करण्याबाबत नियोजन करावे. इटकी पाणीपुरवठ्याबाबत जीवन प्राधिकरणने लक्ष द्यावे. गारपीट झालेल्या भागातील जे नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत त्या शेतकर्यांचा संबंधित अधिकार्यांनी विचार करावा, असे आ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. सांगोला नगरपालिका हद्दीतील वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी केली असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. छावणी चालकांची बिले लवकरच अदा केली जातील. अन्न सुरक्षा कायद्याची तालुक्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी प्रयत्न आहेत. अन्नापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, असे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)