"गाळप हंगाम संपला आता तरी चिमणीचे पाडकाम करून विमानसेवा सुरू करा"
By Appasaheb.patil | Published: March 27, 2023 08:06 PM2023-03-27T20:06:02+5:302023-03-27T20:10:19+5:30
सोलापूर विचार मंचच्यावतीने डॉ. संदीप आडके यांनी आयुक्तांविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार व अपील केले आहे.
सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्याच्या आनधिकृत चिमणीच्या सुनावणीचा अहवाल माहिती अधिकारात न दिल्यामुळे सोलापूर विचार मंचच्यावतीने डॉ. संदीप आडके यांनी आयुक्तांविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार व अपील केले आहे. दरम्यान, आता गाळप हंगाम संपला आता तरी चिमणीचे पाडकाम करून विमानसेवा सुरू करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यंदा को जनरेशन चिमणीची पुन्हा एकदा फेर सुनावणी घेऊन त्यावर कारवाई करण्याचा आदेश असताना सुद्धा तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी डीजीसीए चा अहवाल आल्याशिवाय मी सुनावणी घेणार नाही अशी दिशाभूल करणारी भूमिका घेतली होती. डीजीसीएचा एक अहवाल पूर्वीच आलेला आहे व त्यात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा होटगी रोड विमानतळास प्रामुख्याने अडथळा आहे ह स्पष्ट नमूद आहे. तसेच डीजीसीएच्या व महानगरपालिकेच्या सुनावणी घेण्याचा काहीही परस्पर संबंध नव्हता, परंतु कारखान्याला या हंगामात गाळप करता यावे यासाठी पी. शिवशंकर यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून व कोर्टाचे निर्देश बाजूला ठेवून कारवाई केली नाही, परंतु नवीन आयुक्त यांनी कारखान्याची सुनावणी घेऊन सुद्धा तो अहवाल दाबून ठेवला आहे, त्याची सोलापूर विचार मंच तर्फे वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी तो दिला नाही. त्यामुळे डॉ. संदीप आडके यांनी त्याची माहितीच्या अधिकारात मागणी केली होती, परंतु तो अहवाल त्यांनी एक महिना झाला तरी दिला नाही त्यामुळे त्याबद्दलचे अपील व तक्रार पुणे विभागीय आयुक्तांकडे केली असल्याचे कळवले आहे.
तर गंभीर परिणाम भोगावे लागतील... -
आता कारखान्याचे गाळप संपलेले आहे. विचार मंचने संयमाची भूमिका घेतलेली होती परंतु आता ४७८ कलमानुसार अवैध चिमणी पाडकाम होणे अपेक्षित आहे. याच कारणासाठी अर्जुन रामगिरी १० मार्चपासून सोलापूर ते मंत्रालय चालत निघालेले आहेत व आज ते पनवेल पर्यंत पोहोचलेले आहेत. आता जर प्रशासनाने सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाचा प्रश्न त्वरित मार्गी लावला नाही तर त्याचे गंभीर परिणाम प्रशासन व सरकारला भोगावे लागतील अशी चिन्हे दिसत असल्याचेही सोलापूर विकास मंचचे म्हटले आहे.