राज्यात मागील वर्षीपेक्षा यंदा द्राक्षाची पाच हजार मेट्रिक टन अधिक निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:51 PM2021-04-05T13:51:00+5:302021-04-05T13:51:06+5:30
एकट्या युरोपियन देशात ७, २७१ कंटेनरमधून ९७ हजार ४६ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात
सोलापूर: महाराष्ट्रातून यावर्षी (४ एप्रिलपर्यंत) ९७ हजार ४६ मेट्रिक टन म्हणजे ७ हजार २७१ कंटेनर द्राक्ष एकट्या युरोपियन देशात निर्यात झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही निर्यात पाच हजार मेट्रिक टनाने अधिक आहे. येत्या २० एप्रिलपर्यंत ही निर्यात चालेल असे सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, सातारा, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून प्रामुख्याने द्राक्ष, डाळिब, केळी, फुले व भाजीपाला निर्यात होतो. सध्या द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महाराष्ट्रातील द्राक्षाची निर्यात प्रामुख्याने युरोपियन देशात होते. यावर्षी आतापर्यंत ९७ हजार ४६ मेट्रिक टन( ७२७१ कंटेनर) द्राक्षाची निर्यात युरोपियन देशात झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९२ हजार ३४२ मेट्रिक टन( ६, ८४२ कंटेनर) द्राक्ष निर्यात युरोपियन देशात झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत ही निर्यात पाच हजार मेट्रिक टनाने अधिक झाली आहे.
नाशिकचा मोठा वाटा
महाराष्ट्र शासनाच्या कृषी- पणन खात्याच्या निर्यात विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार एकट्या नाशिक जिल्ह्यातील ८८ हजार ६०२ मेट्रिक टन द्राक्ष युरोपियन देशात निर्यात झाली आहे. सांगली- ५ हजार ४७० मेट्रिक टन. सातारा- २ हजार १४ मेट्रिक टन. लातुर- ४७३ मेट्रिक टन. अहमदनगर- ३५७ मेट्रिक टन. पुणे- २४० मेट्रिक टन. उस्मानाबाद- १४२ मेट्रिक टन. सोलापूर- ६ मेट्रिक टन.
- 0 नेदरलॅंडला ६२ हजार ८२५ मेट्रिक टन ( ४७३ कंटेनर).
- 0 युके( युनायटेड किंगडम)- १७ हजार ३०५ मेट्रिक टन ( १२३२ कंटेनर).
- 0 जर्मनी- ९ हजार २८० मेट्रिक टन ( ७०४ कंटेनर) . इतर लहान- लहान देशातही निर्यात झाली आहे.
राज्यातुन यावर्षी द्राक्ष, केळी, डाळिंब, फुलांची निर्यात चांगली झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातून डाळिंबाची निर्यात चांगली झाली आहे व होत आहे. यावर्षी राज्यातीत द्राक्षाची निर्यात एप्रिल अखेरपर्यंत चालेल.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, महाराष्ट्र शासन
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. अपेक्षेप्रमाणे मालही लागला नाही. याचा परिणाम नक्कीच निर्यातीवर झाला आहे.
- शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ