राजकीय घमासान ; संजयमामांनी पंचवीस वर्षांचा हिशोब मागताच संतप्त शीतलदेवी म्हणाल्या, ‘आजचं बोला !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:32 PM2018-12-28T13:32:15+5:302018-12-28T13:36:48+5:30
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभेत गुरुवारी महिला सदस्यांचा उग्र अवतार पाहावयास मिळाला. मोहिते-पाटील गटाचे सदस्य जास्तच आक्रमक होताना ...
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभेत गुरुवारी महिला सदस्यांचा उग्र अवतार पाहावयास मिळाला. मोहिते-पाटील गटाचे सदस्य जास्तच आक्रमक होताना दिसून आले. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या वक्तव्यावर शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी संतापून मला झेडपीच्या २५ वर्षांच्या राजकारणाचे माहीत नाही. मी इथं महिला म्हणून उभी असून, विषयाची माहिती मला घेऊ द्या असे प्रतिउत्तर देताच सभागृह शांत झाले.
सोलापूर जिल्हा परिषदेची गुरुवारची सभा सहा तास चालली. विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी कोणत्याच विषयावर भाष्य केले नाही. इतकेच काय तर सभेला उशीर होत असल्याचे दिसून आल्यावर बाळराजे पाटील यांच्यानंतर तेही निघून गेले; मात्र सभेत प्रत्येक विषयावर मोहिते-पाटील गटाचे सदस्य आक्रमक होताना दिसत होते. आयत्या वेळच्या विषयामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र व स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण कोठे दिले जाते असा सवाल शीतलादेवी मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला.
त्यावर संबंधित अधिकाºयांनी बार्शी, अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात अशी केंद्रे असल्याचे सांगितले. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण कोठे दिले जाते असे विचारल्यावर प्रत्येक तालुक्यात शाळांमधून कराटे प्रशिक्षण सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यावर महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनी सर्व तालुक्यात असे प्रशिक्षण सुरू असून, केंद्राची यादी देते असे सांगितले. त्यावर समाधान न झाल्याने उमेश पाटील, त्रिभुवन धार्इंजे, वसंतराव देशमुख, अरुण तोडकर यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. गोंधळ थांबविण्यासाठी अध्यक्ष शिंदे यांनी हस्तक्षेप करीत तुम्ही २५ वर्षांचा हिशोब द्या मग मी बोलतो असे सदस्यांना सुनावले. त्यावर उमेश पाटील आणि शिंदे यांच्यात खडाजंगी झाली.
त्यावर शीतलदेवी संतापल्या. झेडपीचे राजकारण मला माहीत नाही. मी नवखी महिला सदस्य आहे. मला विषयाची माहिती घेऊ द्या, असे म्हणताच सभागृह शांत झाले. महिलांना विविध साहित्य पुरविणे यासाठी हेडवर फक्त एक हजार कसे दाखविले आहेत अशी त्यांनी विचारणा केली. त्यावर सीईओ डॉ. भारुड यांनी हेडवर अशी तरतूद दाखवावी लागते, इतर योजनेतून लाभार्थींचा हिस्सा भरण्यासाठी पैसे वळते केले जातात असे सांगितले. रेखा राऊत यांनी शिलाई मशिनच्या निधीबाबत तर शैला गोडसे यांनी अंगणवाड्याच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केले.
मोहोळच्या सभापती समता गावडे, सवितादेवी राजेभोसले यांनी रोजगार हमी योजनेबाबत प्रश्न उपस्थित केले. आरोग्य केंद्राच्या प्रश्नांवर धार्इंजे यांनी आरोग्य तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना लक्ष्य केले. त्यावर अध्यक्ष शिंदे यांनी पहिल्या सभेत प्रस्ताव पाठविल्याचे सांगूनही त्यांचे समाधान होईना. त्यामुळे संतापून सभागृहनेते आनंद तानवडे यांनी प्रतिउत्तर दिले. यावरून पुन्हा गोंधळ झाला.