एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:50 PM2021-11-08T17:50:03+5:302021-11-08T17:50:52+5:30
आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी
सोलापूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत, या आंदोलनावर कोणत्या प्रकारचा तोडगा राज्य सरकार काढत नाही. एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच हायकोर्टाने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक कमिटी तयार केली आहे. या कमिटीला आदेश देण्यात आले आहे की, एसटी कर्मचारी प्रश्नावर त्वरीत तोडगा काढण्यासंदर्भात निर्णय घ्या. एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत, आत्महत्या करीत आहेत, अशा वेळी सरकारने यावर त्वरीत तोडगा काढणे गरजेचे आहे, मात्र सरकार असंवेदनशील असल्याने यावर निर्णय होत नाही. आता हायकोर्टाच्या आदेशानुसार कमिटीने त्वरीत निर्णय घ्यावा अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.
-------
गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा द्या...
सरकारविरोधात आवाज उठविणारे आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत, त्यासाठी सरकारने पडळकर यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून सत्तेवर असताना भाजप सरकारने राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना सुरक्षा दिल्याचीही आठवण यावेळी फडणवीस यांनी करून दिली.