राज्य शासनाचे आदेश; राज्यात पहिल्या टप्प्यात होणार ३३०० संस्थांच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 02:49 PM2021-02-03T14:49:50+5:302021-02-03T14:52:10+5:30
राज्य शासनाचे आदेश; ‘पांडुरंग’, ‘विठ्ठलराव शिंदे’च्या निवडणुकीचा बिगुल
सोलापूर : जिल्ह्यातील श्रीपूर येथील श्री. पांडुरंग सहकारी व पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे मल्टिस्टेट( बहुराजीय) या २०२० मध्ये मुदत संपलेल्या साखर कारखान्यांच्या निवडणुका फेब्रुवारी व मार्चमहिन्यात होणार आहेत. २०२१ मध्ये मुदत संपणार्या श्री. संत दामाजी, श्री. विठ्ठल गुरसाळे, श्री. संत कुर्मदास व भीमा सहकारी टाकळी सिकंदर या मसाखर कारखान्यांच्याही निवडणुका मार्चनंतर होतील असे सांगण्यात आले.
मागील दीड वर्षापासून रखडलेल्या सहकार खात्याच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून मंगळवारी तसे आदेश शासनाने काढले आहेत. येत्या मार्च २०२१ पर्यंत राज्यातील ६४ हजार ३५३ सहकारी संस्था निवडणुकीला पात्र असल्या तरी निवडणुका सुरू होऊन थांबलेल्या ३,३०० संस्थांच्या निवडणुका लागलीच सुरू होतील, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. सहकार खात्याची यंत्रणा कर्जमाफीत अडकल्याने १८ मार्च २०२० च्या आदेशानुसार राज्य शासनाने १७ जून २०२० पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १७ जूनच्या आदेशानुसार १६ सप्टेंबरपर्यंत, २६ सप्टेंबरच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत तर १६ जानेवारीच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली होती. यासाठी शासनाकडून राज्यात कोरोनाचे संकट असल्याचे कारण दाखविले होते. मात्र डिसेंबर-जानेवारी महिन्यात विधान परिषद व ग्रामपंचायत निवडणुका सुरळीत पार पडल्याने शासनाने १६ जानेवारीचा निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश २ फेब्रुवारी रोजी रद्द करीत निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे.
ज्या टप्प्यावर निवडणुका थांबविण्यात आल्या आहेत त्या टप्प्यापासून निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेल्या राज्यातील ३,३०० संस्थांच्या निवडणुका लागलीच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूरच्या १९२ संस्था...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाना-१, वस्त्रोद्योग-१, पशुपक्षी-शेळीमेंढी, दुग्ध- ५३, उत्तर सोलापूर-१३, मंगळवेढा-२८, सोलापूर शहर-३, करमाळा-१०, मोहोळ-४०, पंढरपूर-१३, सांगोला-१९, बार्शी-११ याप्रमाणे ‘अ’ वर्गातील ३, ‘ब’ वर्गातील २९, ‘क’ वर्गातील २०, ‘ड’ वर्गातील १४० संस्थांच्या निवडणुका लागलीच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास आजच शासनाने परवानगी दिली आहे. प्रक्रिया सुरू झालेल्या राज्यातील ३,३०० संस्थांच्या निवडणुका लगेच सुरू होतील. मुदत संपलेल्या उर्वरित संस्थाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला जाईल.
- यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण