मंत्री आणि प्रशासकीय समन्वयात राज्याचे नेतृत्व अपयशी : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:02 PM2020-06-24T17:02:14+5:302020-06-24T17:05:50+5:30
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही केली टीका; प्रशासनातील अधिकाºयांवरही साधला निशाणा
सोलापूर : आपण जेव्हा एखादी लढाई लढतो त्यावेळी त्याला एखादे नेतृत्व द्यावे लागते. त्याचे निर्णय करावे लागतात. समन्वय घडवावा लागतो. समन्वयाचा अभाव नसेल तर राजकीय नेतृत्वाने घडवावा लागतो. कोवीडच्या लढाईमध्ये राज्यातील नेतृत्व समन्वय घडवण्यात कमी पडले आहे, अशी टीका भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापुरात केली.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेल्या कामांची माहिती घेण्यासाठी फडणवीस बुधवारी सोलापूर दौºयावर होते. गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, कोवीडच्या लढाईमध्ये राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्री आणि प्रशासनात समन्वय नाही. प्रशासनात अनेक गट पडलेले दिसतात. प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती स्वत:चा एक प्रोटोकॉल तयार करतोय. त्यांना मार्गदर्शन करायला. मंत्रीमंडळाच्या बाहेरील लोकांना या लढातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन नाही. राजकीय नेतृत्वाने हा समन्वय घडवावा, अशी मागणी मी पूर्वीपासून करतोय.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील वाढत्या कोरोना रूग्णाबाबत माहिती घेतली, शिवाय विविध अधिकाºयांबरोबरच चर्चा करून आढावा घेतला़ शिवाय शासकीय रूग्णालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली़ याचवेळी कोरोना बाधित रूग्णांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना कानमंत्र दिल्याचेही सांगण्यात आले.