राज्यात ३२ ते ३५ जागा मिळणार

By admin | Published: May 12, 2014 01:21 AM2014-05-12T01:21:05+5:302014-05-12T01:21:05+5:30

भाजपाची एकहाती सत्ता येणार गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास :

The state will get 32 ​​to 35 seats | राज्यात ३२ ते ३५ जागा मिळणार

राज्यात ३२ ते ३५ जागा मिळणार

Next

 

सोलापूर : राजीव गांधी यांच्या निधनानंतर देशात आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला एक हाती सत्ता मिळाली नाही़ गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला यंदा पराभवाला सामोरे जावे लागणार आहे, असे सांगत सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पार्टीला देशात एक हाती सत्ता मिळणार आहे तर महाराष्ट्रात ४८ पैकी कमीत कमी ३२ ते ३५ उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला. अक्कलकोट येथील देवदर्शनाला जाण्यासाठी गोपीनाथ मुंडे हे सोलापूरच्या दौर्‍यावर आले असता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सिद्रामप्पा पाटील उपस्थित होते. यावेळी गोपीनाथ मुंडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. पहिल्यांदाच देशातील लोकसभेची निवडणूक अटीतटीची झाली असून, आता लोकांचे डोळे निकालाकडे लागले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालावधीत देशात भाजपाला १८३ जागा मिळाल्या होत्या. सध्याचे वातावरण पाहिले तर भाजपाला विक्रमी २४0 ते २५0 जागा मिळतील. यापूर्वी उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात भाजपा नाही असा समज होता मात्र दक्षिणेत पक्षाला चांगले यश मिळेल. काँग्रेसचे अपयश, देशात फोफावलेला भ्रष्टाचार, महागाई हे तीन मुद्दे घेऊन आम्ही लोकसभा निवडणूक लढवली आहे. बेरोजगारी, देशाचे आर्थिक अवमूल्यन याविषयीची थेट चर्चा लोकांमध्ये घडवून आणली आहे. अनेक ज्वलंत प्रश्न हाताळण्यात आले आहेत. नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी सर्वाधिक लोक येत होते, यामध्ये २0 ते ३५ वयोगटातील तरूणांचा सहभाग मोठा होता, असे गोपीनाथ मुंडे म्हणाले. अनेक वर्षांपासून केंद्रात कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने यंदा लोकांना ५ वर्षांचे स्थिर, समर्थ आणि जनतेचे प्रश्न सोडविणारे सरकार हवे आहे़ त्यामुळे जनता भाजपाच्या बाजूने आहे असे सांगत मुंडे म्हणाले की, या निवडणुकीत महायुती करण्यात आली होती़ त्यामुळे भाजप, सेना, रिपाइं, शेकाप, रासप, शिवसंग्राम या सहा पक्षांची ताकदही मोठ्या प्रमाणात मिळाली आहे. संयुक्त प्रचार आणि सोशल इंजिनिअरिंगमुळे पक्षाची १0 टक्के मते वाढली आहेत. सत्तेवर आल्यानंतर प्रथमत: टोल बंदी, एल.बी.टी.रद्द करणे आणि ५0 टक्के वीज बिल माफ तसेच शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार आहोत, हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये गेलो होतो, लोकांनी आम्हाला स्वीकारले असून राज्यात महायुती तर देशात भाजपाची सत्ता येणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाबद्दल विचारले असता मुंडे म्हणाले की, देशात सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंब्याची भासली तरीही मोदी हेच पंतप्रधान असतील. राज्यातील दलित अत्याचारावर बोलताना मुंडे म्हणाले की, देशात सर्वाधिक दलित आणि आदिवासींवरील अत्याचार हे महाराष्ट्रात झाले आहेत. या अत्याचाराला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारच जबाबदार आहे. बहुतांश अत्याचारांमध्ये सहभाग दिसून येतो. गेल्या काही वर्षभरात १ हजार ६४३ अत्याचारांचे गुन्हे दाखल झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना जाब विचारला तर ते फक्त विशेष न्यायालये स्थापन केल्याचे सांगतात मात्र गुन्हे होणार नाहीत यावर काही बोलत नाहीत. राज्यात आष्टी, अहमदनगर, जालना या ठिकाणी दलितांवर अन्याय, अत्याचार व हत्या झाल्या आहेत. खैरलांजीमध्येही असेच झाले होते, सत्ताधार्‍यांकडे यावर उत्तर नाही. या सर्वांचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून काढून घेऊन तो सी.बी.आय.कडे सोपवला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी मुंडे यांनी व्यक्त केली.

 

------------------------------

 

देशमुखांचा राजीनामा मंजूर करू.... माजी खासदार सुभाष देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल बोलताना मुंडे म्हणाले की, माझ्यासोबत असताना सुभाष देशमुख यांना एकदा विधानसभेचा आमदार आणि एकदा लोकसभा खासदार केले होते, त्यानंतर गेल्या ८ ते १0 वर्र्षांपासून ते मला भेटले नाहीत. ते कुठे आहेत मला त्यांना बघायचे आहे. त्यांनी प्रदेश कार्यकारिणीकडे राजीनामा पाठवला असेल तर तो मंजूर केला जाईल. आमदार विजयकुमार देशमुखांनी सुचवले आणि जनरेटा पाहिला तर अ‍ॅड. शरद बनसोडे हेच आघाडीवर असल्याने त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले, देशमुखांचे आम्हाला ऐकावे लागते आणि ते निवडून येणार यात शंका नाही.

 

मोहिते-पाटील भेटले पण स्थिती नव्हती... माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपाकडून तिकिटाची मागणी केली होती मात्र परिस्थिती नसल्याने देता आले नाही. राज्यात लोकसभेसाठी रिपाइं, शेकाप, रासपा आदींना माझ्याच सांगण्यावरून उमेदवारी देण्यात आली आहे, त्याचे चांगले-वाईट परिणाम भोगायला मी तयार आहे अशी कबुलीही यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी दिली.

 

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बेबनाव... निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व दिसून आले मात्र काँग्रेसचा कोणी वाली नसल्याचे आढळून आले. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बेबनाव असून पराभवानंतर तो आणखी वाढणार आहे. शरद पवार येणार नाहीत... देशात आणि राज्यात महायुतीला जागा कमी पडल्यास शरद पवार आपल्या सोबत आले तर? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मुंडे म्हणाले की, पवार येण्याचे प्रश्नच येत नाही कारण बहुमत मिळणार आहे. राज्यात मनसेचा परिणाम होणार का? राज्यात मनसेचा परिणाम होणार नाही कारण राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे यंदा मनसेची मतेही भाजपाला मिळाली आहेत.

 

शरद पवारांचे टार्गेट नवीन नाही... १९९५ साली मी विधानसेभत असताना शरद पवारांची सत्ता घालवली होती, त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग आहे. ते प्रत्येक निवडणुकीत मला टार्गेट करीत असतात हे मला नवीन नाही.

Web Title: The state will get 32 ​​to 35 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.