दिल्लीतील पुतळा विटंबना प्रकरण; एनएसयूआयच्या फलकावर शाई फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:31 AM2019-08-23T11:31:15+5:302019-08-23T11:40:28+5:30
विद्यार्थी परिषदेच्या विरोधात दिली तक्रार; सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी अन् निदर्शने
सोलापूर : दिल्ली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे पडसाद सोलापूर शहरात पडले. जिल्हा परिषदेसमोरील काँग्रेस भवन येथे असणाºया एनएसयुआयच्या (नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया) फलकावर शाई फेकण्यात आली. या विरोधात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळी भगतसिंग जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. हा पुतळा दिल्ली विद्यापीठाच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याचा अरोप एनएसयुआयने केला होता. बुधवारी रात्री एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील काँग्रेस भवन येथे आले. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, कृषी गोसेवा संघ यांच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या फलकावर काळी शाई फेकली. यावेळी एनएसयुआय मुर्दाबाद, भारत मात की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणाही देण्यात आल्या. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता गणेश डोंगरे यांना एनएसयुआयच्या फलकावर शाई फेकल्याचे कळले. तिथे नगरसेवक विनोद भोसले, युवक कॉँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष तिरुपती परकीपंडला हे देखील आले. त्यांनी झालेल्या प्रकाराविरोधात एनएसयुआयकडून समर्थ बंडे, सुधीर बहिरवडे, यतिराज होनमाने, किरण जाधव, संकेत अटकळे, चिदंबर कारकल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
राजकारण तापले !
- दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील विद्यार्थी राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात असणाºया विद्यार्थी संघटनात आताच वाद सुरू झाल्याचे दिसत आहे.