आत्मनिर्भरतेसाठी पाऊल ; मूकबधिरांनी बनविल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 02:31 PM2018-08-23T14:31:47+5:302018-08-23T14:33:52+5:30
सोलापुरातील ममता मूकबधिर विद्यालयातील उपक्रम
सोलापूर : सोलापुरातील ममता मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढविणाºया ठरत आहेत. व्यवसाय शिक्षणांतर्गत ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांच्या विक्रीच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर झळकणारा स्वनिर्मितीचा आनंद बरेच काही सांगून जाणारा ठरत आहे.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड जिल्हा शाखेच्या वतीने येथील उत्तर सदर बझार परिसरात ममता मूकबधिर विद्यालय चालविले जाते. येथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारी ७५ मुले-मुली आहेत.
शालेय शिक्षणासोबत या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणांतर्गत राखी मेकिंगसह अन्य प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी राख्या तयार करणे, दिवाळीसाठी पणत्या, ग्रीटिंग, आकाश कंदील तयार करणे, रंगपंचमीला पर्यावरणपूरक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण या शाळेतील कलाशिक्षिका नीता देशपांडे या देतात. बाजारातून कच्चा माल आणून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर वस्तू तयार करायच्या, त्यानंतर शाळेसमोरच स्टॉल लावून त्याची विक्री विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करायची, असा हा प्रकार असतो.
यंदाही राखी सणानिमित्त सुमारे ५०० राख्या येथील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. त्यांची विक्रीही शाळेतच दुकान लावून सुरू आहे. परिसरातील नागरिक, पालक मोठ्या आनंदाने त्या खरेदी करतात. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान कळावे, यासाठी विक्रीचा व्यवहार, हिशेब ठेवणे, हिशेब तपासणे या जबाबदाºयाही त्यांच्याकडूनच करून घेतल्या जातात. यामुळे त्यांच्यामध्ये आपोआपच व्यवहारज्ञान विकसित होत असते.
भविष्यात शाळेतून बाहेर पडल्यावर या विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी आम्ही असे उपक्रम राबवित असतो. यामागे नफ्याची भावना नसून विद्यार्थ्यांमध्ये कला विकसित करणे, त्यांना व्यवहारज्ञान प्रात्यक्षिकातून मिळवून देणे हा यामागील आमचा हेतू असतो. आमच्या कलाशिक्षिका नीता देशपांडे यांचे यात सक्रिय योगदान असते.
- वाबय्या म्हेत्रे,
मुख्याध्यापक