विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर पुन्हा वळू लागली वारकऱ्यांची पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:10+5:302021-06-22T04:16:10+5:30
पंढरीत गर्दी झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो. यामुळे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन भाविकांसाठी बंद केले होते. त्यामुळे ...
पंढरीत गर्दी झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो. यामुळे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन भाविकांसाठी बंद केले होते. त्यामुळे विठ्ठल मंदिराचे दरवाजे बंद केले आहेत. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना जिल्हाबंदी केली होती. यामुळे भाविकांना पंढरीत येण्यापासून पोलीस प्रशासनाने रोखले होते. परंतु आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. यानंतर निर्जला एकादशीही पहिलीच एकादशी व आषाढी यात्रेपूर्वीची देखील एकादशी आहे. यामुळे भाविकांनी, फडकरी व दिंडीकऱ्यांनी गर्दी केली होती.
पंढरीत आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंटात भजन, कीर्तन केले. त्यानंतर विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घतले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा पूर्ण केले. प्रदक्षिणा मार्गावरील चौफाळा मंदिराजवळ अभंग, कीर्तन करण्यात आले. यामुळे प्रदक्षिणा मार्गावर गर्दी दिसून आली.
----
आम्हाला सदैव तुझे दर्शन होऊ दे...
लॉकडाऊनच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोमवारी निर्जला एकादशीनिमित्त पंढरीत ‘ज्ञानाबा-ज्ञानबा-तुकाराम’चा नामघोष ऐकू आला. कित्येक महिन्यांनंतर विठ्ठलाच्या नगरीत आल्यानंतर समाधान वाटत आहे. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन झाले नसले तरी, श्री संत नामदेव पायरीचे दर्शन झाले. सर्वांना कोरोनामुक्त कर, आम्हाला सदैव दर्शन होऊ दे, असे साकडे पंढरीत आलेल्या भाविकांनी विठ्ठलाकडे घातले.
-----
चंद्रभागा वाळवंटातून भजन, कीर्तन करत प्रदक्षिणा पूर्ण करताना भाविक.
प्रदक्षिणा मार्गावर नगरप्रदक्षिणा पूर्ण करताना भाविक.