लऊळ आठ दिवसांसाठी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:21+5:302021-04-18T04:21:21+5:30
कुर्डूवाडी : लऊळ येथे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील ग्रामपंचायतीच्या कोविड समितीने संपूर्ण गाव केवळ मेडिकल व दवाखाने सोडून ८ ...
कुर्डूवाडी : लऊळ येथे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील ग्रामपंचायतीच्या कोविड समितीने संपूर्ण गाव केवळ मेडिकल व दवाखाने सोडून ८ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
व्यापाऱ्यांचे समृद्ध गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या १२ हजार लोकसंख्येच्या लऊळ गावाने राज्य शासनापेक्षाही आपल्या स्तरावर कडक नियम करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. येथे दररोजच्या कोविड तपासणीत बाधित रुग्ण वाढू लागले आहेत. त्यांची संख्या १००च्या पुढे गेल्याने माजी उपसभापती प्रतापराव नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे गाव लवकरच बाधित रुग्णांची साखळी तोडण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सरपंच पूजा बोडके व उपसरपंच संजयबापू लोकरे यांनी माजी उपसभापती प्रतापराव नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील श्री संत कुर्मदास विद्यामंदिरच्या आवारात गावातील नागरिकांची बैठक घेतली.
कोरोना महामारीने त्रस्त लोकांना यापासून वाचवायचे असेल तर शासनाने तयार केलेल्या सर्व नियमांची अंमलबजावणी करावीच लागेल. त्याचबरोबर शासनाने जरी लॉकडाऊनमधून किराणा दुकानंसह काही दुकानांना सूट दिली असली, तरीही आपल्या गावातील दुकाने बंद ठेवून गावातील रुग्णांची साखळी तोडू, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. गावकऱ्यांनीही याला एकमुखाने मान्यता दिली.
----
गावातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे शासनापेक्षा आपल्या गावच्या हितासाठी आम्ही सर्वांनी मिळून गाव आठ दिवस कडकडीत बंद ठेवून रुग्ण साखळी तोडण्याचे ठरवले आहे. यासाठी आम्ही गावकऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. गाव लवकरच कोरोनामुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- पूजा बोडके, सरपंच व संजयबापू लोकरे, उपसरपंच, लऊळ