चोरी झालेली दुचाकी विहिरीत सापडली; पण चोर सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:17+5:302021-04-04T04:22:17+5:30
बॅगेहळ्ळीतील बापूराव खांडेकर यांची २८ फेब्रुवारी रोजी रात्री घरासमोर लावलेली एमएच १३ बीएम ०५९५ ही दुचाकी चोरीस गेली. चार ...
बॅगेहळ्ळीतील बापूराव खांडेकर यांची २८ फेब्रुवारी रोजी रात्री घरासमोर लावलेली एमएच १३ बीएम ०५९५ ही दुचाकी चोरीस गेली. चार दिवस गावच्या परिसरात शोध घेतला; पण ती सापडली नसल्याने खांडेकर यांनी ३ मार्च रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जेऊर बीटचे अंमलदार दादाराव अर्जुन पवार यांनी तपास सुरू केला. दरम्यान, ग्रामस्थांना गावाजवळीलच सार्वजनिक विहिरीत ती दुचाकी सापडली. ती पोलिसांच्या ताब्यात दिली; पण अद्याप त्या चोराचा पोलिसांना शोध लागला नाही.
याच गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज शिंदे यांचीही दुचाकी चोरीला गेली होती. त्यांनीही ६ मार्च रोजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तरी त्यांच्या दुचाकीचा शोध लागलेला नाही. दुचाकी चोरणारा चोर हा गावातीलच असून त्याचे नावही पोलिसांना सांगितले. पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत, तरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीच या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तीन दिवसांपूर्वीच एका चारचाकी वाहनाची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न तो करीत होता. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यास हटकल्यानंतर तो निघून गेला. याबाबतची माहिती देऊनही पोलीस ठोस कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे आता आरोप ग्रामस्थ करीत आहेत. सध्या खांडेकर यांची चोरलेली दुचाकी पोलीस ठाण्यात आहे, तर दुचाकी चोरणारा गावात मोकाटपणे फिरत आहे.
दुचाकी चोरणारा चोर गावातलाच
दुचाकी चोरणारा चोर हा गावातलाच असून यापूर्वी त्यास दुचाकी चोरीप्रकरणी दाेन वर्षे कारवासाची शिक्षा झाली होती. त्याची शिक्षा संपून तो पुन्हा गावी आला आहे. त्यानंतर तो सुधारेल, असे ग्रामस्थांना वाटत होते; पण त्यात सुधारणा झाली नाही. उलट पूर्वीपेक्षा जास्त दुचाकींची चोरी करू लागला. दुचाकी चोरीप्रकरणी संशयित म्हणून त्याचे नाव ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले, तरीही पोलीस त्यास अटक करीत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
फोटो
०३अक्कलकोट-क्राईम
ओळी
बॅगेहळळी अज्ञात चोरट्याने चोरलेली दुचाकी विहिरीत टाकल्याचे दिसत आहे.