चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
By काशिनाथ वाघमारे | Published: August 21, 2023 06:06 PM2023-08-21T18:06:12+5:302023-08-21T18:06:34+5:30
गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी गजाआड
सोलापूर : रेल्वे प्रवासात गुंगीचे औषध देऊन लुटणा-या टोळीला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडून त्यांचाकडील ७ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने आणि ११ लाख ५० हजारांचे मोबाईल हस्त केले. जप्त केलेला १८ लाख ८० हजारांचा ऐवज लोहमार्गचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या हस्ते सोमवारी संबंधीत प्रवाशांना वितरीत करण्यात आला.
सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात पार पडलेल्या मुद्देमाल वितरण सोहळ्याप्रसंगी लोहमार्गचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत भोसले, पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता हत्ती, सहायक पोलीस निरीक्षक एम. जे. गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. रेल्वेतून प्रवास करत असताना मागील वर्षभरात अनेक प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन अथवा हिसका मारुन मोबाईल, दागिने पळवल्याच्या घटना घडल्या.
सायबर सेलच्या मदतीने टोळीला ताब्यात घेऊन अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. जप्त केलेले मोबाईल आणि दागिने परत करण्यासाठी संबंधीत प्रवाशांना सोलापुरात बोलावून घेण्यात आले होते. यावेळी सहायक फौजदार संजय जाधव, पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत जमादार, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद गायकवाड, प्रकाश कांबळे, दिलीप लोहकरे उपस्थित होते.