‘एकरूख’मध्ये पाणी आणण्यासाठी फोडला जातोय पाषाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:17 PM2019-09-24T13:17:02+5:302019-09-24T13:19:49+5:30
निरूपणकारांनी घेतले मनावर; लोकवर्गणीतून उपक्रम; मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केल्याने कामाला आला वेग
अरुण बारसकर
सोलापूर: पाऊस नसल्याने पाणी मिळणे ही आज नवलाई वाटू लागली आहे. ही अवस्था असल्याने नरोटेवाडीकरांनी निरूपणासाठी आलेल्या निरूपणकार वामन शिंदे यांना शेजारून वाहणाºया कालव्याचे पाणी दाखविले. निरूपणकारांनी मनावर घेतले अन् पाणी आणण्यासाठी पाषाण फोडण्याच्या कामाला सुरुवात झाली. लोकवर्गणी देण्यासाठीही हात पुढे आल्याने सहा दिवसांत मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात तर पाण्याची स्थिती अतिशय खराब आहे. सोलापूर शहरासाठी एकरुख तलावात पाणी आणण्याचे महानगरपालिकेने केलेले प्रयत्नही थांबले आहेत. उत्तर तालुक्यातील गावोगावी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निरूपण दिले जाते. निरूपणासाठी वामन शिंदे नरोटेवाडीला आले होते. तेथील महिला व पुरुषांनी शिरापूर उपसा सिंचनचे पाणी पारवे तलावात आणता येईल; मात्र खोदाई करावी लागेल, असे सांगितले.
वामन शिंदे हे गावकºयांसोबत कॅनॉलवर गेले. तेथून पारव्याचा तलावही पाहिला अन् गावात येऊन शशी शिंदे, बाळासाहेब पौळ, दाजी जाधव यांना सांगितले. त्यांनी माळरान तुडवत परिसर पाहिला. खोदाई केली तर पाणी येईल मात्र पैसे मिळणार कसे?, हा प्रश्न समोर असल्याने या कार्यकर्त्यांनी काही राजकीय नेते, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना ही कल्पना दिली. त्यांनी होकार देताच प्रत्यक्षात बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी कामाला सुरुवात झाली. मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केल्याने शिरापूर उपसा सिंचनचा कालवा ते पारवे तलावापर्यंतच्या खोदाईचे काम सुरू आहे.
साधारणत: या ८०० मीटरच्या अंतरात संपूर्ण पाषाणच आहे. पाण्यासाठी पाषाण फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. विष्णू जगताप, प्रवीण लबडे, रामू पौळ, शिवाजी जाधव, भाऊ शिंदे, किरण जाधव, अंगद चव्हाण, अरुण शिंदे, उमेश भगत, बजरंग देवकर, दगडू उंबरे, कुमार शिंदे, शिवाजी पाटील, शरद काटे, बापू शिंदे आदी रात्रंदिवस लोकवर्गणीतून काम करून घेत आहेत.
२७ फुटांपर्यंत होतेय खोदाई
- - कॅनॉल ते पारवे तलाव हे अंतर ८०० मीटर असून, १० ते २७ फुटांपर्यंत खोदाई करावी लागत आहे.
- - अभियंता जवाहर उपासे यांनी सर्व्हे केला असून, त्यांच्या मते खोदाईचे काम झाले तर पारवे तलावात पाणी येऊ शकते.
- - बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, महेश थोबडे, सिद्धेश्वर कंट्रक्शनचे सिद्धेश्वर काळे, यश कंट्रक्शनचे प्रल्हाद काशीद यांनी मोठी मदत केली असून उळे, हगलूर, हिप्परगा, एकरुख-तरटगावचे ग्रामस्थ लोकवर्गणी देत आहेत.
- - शशी शिंदे यांच्या आर्या व सत्यशील या मुलांनी गल्ला फोडून २४ हजार रुपये दिले.
- - नरोटेवाडीचे दगडू उंबरे व ग्रामस्थ रात्रंदिवस कामावर बसून असून कामगारांना चहा, नाष्टा, जेवणाची सोय नरोटेवाडीकर करीत आहेत.
पाणी येणार किती?
शिरापूर उपसा सिंचनाचे पाणी नान्नज येथील कॅनॉलमधून पारवे तलावात आल्यानंतर उताराने नाल्याद्वारे नरोटेवाडी, सेवालालनगरच्या ओढ्यात येणार आहे. तेथून होनसळच्या ओढ्यातून पुढे एकरुख तलावात येणार आहे. ८०० मीटरचा पाषाण फोडून पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला तर शिरापूर उपसा सिंचन योजना किती दिवस सुरू राहणार व एकरुख (हिप्परगा) तलावात पाणी किती येणार हे उजनी कालवा मंडळाच्या भूमिकेवर अवलंबून आहे.
बालाजी अमाईन्स व अभियंता जवाहर उपासे यांनी सर्व्हे करून पाणी येईल असे सांगितले आहे. खोदाईचे काम आठवडाभरात पूर्ण होईल. लोकवर्गणीतून आतापर्यंत २५ लाख रुपये जमले असले तरी आणखीन पैशाची गरज आहे. एकरुख तलावात पाणी आले तर आसपासच्या गावांची व सोलापूर शहराची तहान भागेल.
- शशी शिंदे