Solapur: गुरसाळे येथे महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी केली दगडफेक; तलवारी, कोयते घेऊन माजवली दहशत
By Appasaheb.patil | Published: February 25, 2024 02:26 PM2024-02-25T14:26:44+5:302024-02-25T14:27:01+5:30
Solapur News : गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी तलवारी, कोयते घेऊन दगड फेक केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
पंढरपूर - गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी तलवारी, कोयते घेऊन दगड फेक केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रांत अधिकारी सचिन ईतापे व तहसीलदार सचिन लंगोटे यांना मिळाली त्यांनी तत्काळ खर्डीचे मंडळ अधिकारी दिलीप सरवदे, बोहाळी तलाठी विष्णू व्यवहारे, सोनके तलाठी अमर पाटील, तावशीचे कोतवाल सुधाकर हिल्लाळ, खर्डीचे कोतवाल सुधाकर चंदनशिवे हे महसूल पथक गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे कारवाईसाठी पाठवले. हे पथक रविवारी पाच वाजता नदी पात्रात पोहचले. यावेळी चार टीपर, एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर, होते.
यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाळू माफियांनी त्यांनी कर्मचाऱ्यांना मदत करतो असे सांगून ते तेथून गेले अन् काही वेळाने ३० ते ४० लोकांसह हत्यारे घेऊन आले. त्याचबरोबर महसूलच्या पथकावर दगड फेक सुरू केली. व तीन टीपर, एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. एक वाहन चालू झाले नाही वाळू चोर तेथे सोडून गेले. यानंतर पथकाने एक टीपर जप्त केला आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मोक्का लावणार
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर मोक्काची कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसिलदार सचिन लंगोटे यांनी सांगितले. टोळी प्रमुख कृष्णा सोमनाथ नेहातराव ( रा. रामबाग, जुनी पेठ, पंढरपूर), रोहीत लक्ष्मण अंभगराव (रा. रामबाग, जुनी पेठ, पंढरपूर), सदस्य स्वप्नील अरुण आयरे ( रा. चीलाईवाडी, ता. पंढरपूर) या तिघांना सोलापूर जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले. वरील तिघांवर सात वाळू चोरी व खूनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे, खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, उप विभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी, पोलीस हवालदार सुरज हेंबाडे, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचुकले इत्यादी यांनी केली आहे.