बारलोणीतील पोलिसांवर दगडफेक प्रकरण; आणखीन दोन संशयितांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:15 PM2021-01-13T14:15:19+5:302021-01-13T14:15:52+5:30

तेलंगणा पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेडचा एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेने रेकी करून केली कारवाई

Stone-throwing case against police in Barloni; Two more suspects were detained | बारलोणीतील पोलिसांवर दगडफेक प्रकरण; आणखीन दोन संशयितांना घेतले ताब्यात

बारलोणीतील पोलिसांवर दगडफेक प्रकरण; आणखीन दोन संशयितांना घेतले ताब्यात

Next

लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी

    सांगोला पोलिस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्यातील तपासात निष्पन्न झालेले आरोपी पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक बारलोणी (ता.माढा) येथे गेले असता पथकावर स्थानिक लोकांनी हल्ला करून तीन पोलीस कर्मचारी जखमी केले होते.सदर घटनेबाबत कुर्डुवाडी पोलिसांत हल्ला करणाऱ्या मुख्य अकरा आरोपींसह इतर पन्नास जणांवर गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्यातील राहुल सर्जेराव गुंजाळ( वय २२),यशवंत दशरथ गुंजाळ (वय ३०), अनिल दशरथ गुंजाळ (वय ४१) हे तीन आरोपी हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच  कुर्डूवाडी पोलीस पथकाकडून पकडण्यात आले होते.त्यांना माढा  न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.उर्वरित सर्व आरोपींच्या शोधात गुन्हे शाखेचे पथक,स्थानिक पोलिसांचे पथक, व इतर पथके रवाना झालेली होती. मंगळवारी रात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान बारलोणी गावात काही आरोपी फिरत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सदरच्या ठिकाणची गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी रेकी करून स्थानिक गुन्हे शाखेकडील इतर अधिकारी व कर्मचारी, मुख्यालयाकडील आरसीपी पथक यांच्या संयुक्तरित्या बारलोणी गावात जाऊन सदर गुन्हयातील निष्पन्न संतोष विनायक गुंजाळ, (वय-३०), सुभाष उर्फ सुभान रामा गुंजाळ (वय -५५) दोघे रा.बारलोणी यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करून कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे बारलोणी पोलीस हल्ला प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

यात तेलंगणा पोलिसांना हवा असलेला मोस्ट वॉन्टेड आरोपीही गुन्हे शाखेच्या  हाती लागलेला आहे.आरोपी सुभाष उर्फ सुभान रामा गुंजाळ हा करीमनगर (राज्य तेलंगणा) मधील गुन्हातील निष्पन्न आरोपी असुन त्याने त्याच्या इतर साथीदारांसह तिथे दिड किलो चांदी व २ लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरलेला आहे. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील,सपोनि रवींद्र मांजरे,सपोनि श्याम बुवा,स्थानिक गुन्हे शाखेचे ३३ कर्मचारी व पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पोलीस पथकाने केली आहे.सापडलेल्या त्या दोन आरोपींना माढा न्यायालयात बुधवारी हजर करण्यात येणार आहे.

 

Web Title: Stone-throwing case against police in Barloni; Two more suspects were detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.