कृषिपंपांची वीजतोडणी थांबवा; अन्यथा शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:18 AM2021-04-03T04:18:44+5:302021-04-03T04:18:44+5:30
दक्षिण सोलापूर : भीमा-सिना नद्यांच्या परिसरात कृषिपंपांची वीज तोडून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवून ...
दक्षिण सोलापूर : भीमा-सिना नद्यांच्या परिसरात कृषिपंपांची वीज तोडून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवून शेतकऱ्यांना सवलतीने वीज बिल भरण्याची संधी द्या, अन्यथा याचे शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होतील, असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी महावितरणला दिला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी कोरोना संसर्ग, अतिवृष्टी, भीमा-सिना नद्यांचा महापूर, लॉकडाऊन, आदी संकटांनी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा वेळी त्यांना आधार देणे ही सरकारची जबाबदारी आहे. वीज बिल भरण्याची त्यांची इच्छा असली तरी सध्या त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे बिलाची रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी. वीज तोडण्याची मोहीम तातडीने थांबवून तोडलेली वीज तातडीने जोडण्याची मागणी बाबा मिस्त्री यांनी जिल्हाधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
ही मोहीम दोन दिवसांत थांबली नाही तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, भंडारकवठेचे सरपंच चिदानंद कोटगोंडे, सादिक आत्तार, अरुणा बेंजरपे होते.