प्रभू रामासाठी मांस अन् दारु विक्री बंद करा; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी
By शीतलकुमार कांबळे | Published: January 4, 2024 12:11 PM2024-01-04T12:11:04+5:302024-01-04T12:12:37+5:30
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याना पाठविले पत्र.
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : प्रभू श्रीरामासाठी २१ व २२ जानेवारी रोजी देशात मांस अन् दारु विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाने केली आहे. ह दोन दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा असून ऐतिहासिक दिवस असल्याने ही मागणी मान्य करावी अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी केली.
प्रभु श्रीरामचंद्र मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. त्यामुळे २१ व २२ जानेवारी या दोन दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात मांसाहार व दारु विक्री बंद करण्यात यावी. मांसाहारामुळे असुरी विचार बळावतात असे अनेक ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. असुरी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे. स्वहितासाठी व देश हितासाठी खूपच महत्त्वाचे आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो एक दिवस उपवास करण्याचा संकल्प केला आहे. आपण भारतीयांनी सुद्धा एक संकल्प केला पाहिजे. तो म्हणजे हा एक दिवस तरी पुर्ण सात्विक आहार घेऊन आपली सेवा श्रीरामाचे चरणी अर्पण करावी . तसेच आपल्या परिसरातील मंदिर, सार्वजानिक हॉल अशा ठिकाणी २२ जानेवारी रोजी भजन, कीर्तन, प्रवचन, कथा करुन उत्सव साजरा करावा, हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे, असे प्रयत्न सर्वांनी करावेत असे आवाहन ही इंगळे महाराज यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचे माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार व दारु विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे देण्यात आले आहे असे सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.