समाजातील माथेफिरूंना वेळीच रोखा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवू
By दिपक दुपारगुडे | Published: October 22, 2023 05:25 PM2023-10-22T17:25:48+5:302023-10-22T17:26:02+5:30
अक्कलकोट शहर शांतताप्रिय आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्याइतक्या माथेफिरू लोकांमुळे शांतता बिघडत आहे.
सोलापूर : अक्कलकोट शहर शांतताप्रिय आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्याइतक्या माथेफिरू लोकांमुळे शांतता बिघडत आहे. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांची समजूत काढून त्यांना आवरा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवून बंदोबस्त करू, अशा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी दिला.
अक्कलकोटमध्ये शनिवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी विलास यामावार बोलत होते. यावेळी डीवायएसपी यामावार म्हणाले, मारामारीच्या घटनांमुळे गोरगरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असते. गुन्हा दाखल झाल्यानंतर युवकांचे आयुष्य बरबाद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीपासून अक्कलकोट शहर गुण्यागोविंदाने नांदत आहे. काही लोकांमुळे शहराचे नाव खराब होत आहे. यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर शेकडो कुटुंबाची उपासमार होईल, असे महेश इंगळे यांनी सांगितले.
गुन्हेगारी लोकांना तडीपार करण्याचा इशारा
गुन्हेगारी लोकांची यादी करून तडीपाराची कारवाई करण्यात येईल. कोणीही अशा लोकांना थारा देऊ नये. पोलिस ताब्यात घेताच नेते ठाण्यात येतात. त्यामुळे त्या प्रवृत्तीची ताकद वाढते. कालची घटना किरकोळ कारणावरून घडली आहे. स्वामींचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट शहराला गालबोट लागू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी, अन्यथा आमचे काम आम्ही करू, अशा इशाराही प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिला.