समृद्धी महामार्गाप्रमाणे सूरत-चेन्नई ग्रीनफील्ड हायवेला मोबदला देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको
By विठ्ठल खेळगी | Published: March 27, 2023 03:51 PM2023-03-27T15:51:06+5:302023-03-27T15:51:32+5:30
अक्कलकोट जवळील सोलापूर महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सोलापूर : समृद्धी महामार्गासाठी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे. त्याप्रमाणे सुरत चेन्नई बाधित शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी अक्कलकोट जवळील सोलापूर महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये अक्कलकोट,दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर, कासेगाव, तुळजापूर,बार्शी येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुरत चेन्नई हरित महामार्गासाठी अत्यल्प मावेजा देऊन शासनाने पाच जिल्ह्यातील शेतकरी संपवण्याचा डाव आखला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आज प्रचंड संख्येने उपस्थित राहून रोष प्रकट केला.
यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, नगरसेवक महेश हिंडोळे, बाळासाहेब मोरे, स्वामीनाथ हरवाळकर, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, रासपचे सुनील बंडगर, शिवसेनेचे आनंद बुक्कांनुरे, सुरेखा होळीकट्टी यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात वीरेश भंगरगी, विश्वनाथ भरमशेट्टी, प्रिया बसवंती, प्रियंका दोड्याळे, चंद्रशेखर मडीखांबे, सिद्धाराम भंडारकवठे, कालिदास वळसंगे, सिद्धार्थ गायकवाड, सुभाष शिंदे, दत्ता माडकर, चिदानंद उन्नद आदी उपस्थित होते.
पुढील आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्याचे या आंदोलनात ठरले. अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना निवेदनाचे प्रत देण्यात आले.उत्तरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि दक्षिणचे महेश स्वामी यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे अक्कलकोटच्या दिशेने व सोलापूरच्या दिशेने तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.