रुबेला लसीकरण थांबवा, आरोग्य राज्यमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:41 PM2018-12-11T14:41:50+5:302018-12-11T14:42:05+5:30
आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी
सोलापूर : गोवर व रुबेला प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेश डोंबाळे (रा. औज, ता. दक्षिण सोलापूर) याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. येथील शासकीय रुग्णालयात आणखी मुले उपचारासाठी दाखल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकराची मोहिम तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
रुबेलाच्या लसीकरणामुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ही लसीकरण मोहीम थांबविण्यात यावी. कोणतेही संशोधन न करता जबरदस्तीने मुलांना इंजेक्शन घ्यायला लावले जात आहे. हा ऋषिकेश डोंबाळे हा लस घ्यायला तयार नव्हता. दोन वेळा पळून गेल्यानंतर त्याला पकडून आणून लस देण्यात आली. शाळा लसीकरणाची सक्ती करत असतील पालकांनी विरोध करावा. जोपर्यंत संशोधन होत नाही तोपर्यंत ही मोहिम थांबवावी, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याला आरोग्य राज्यमंत्री जबाबदार असल्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. हे सरकार संवेदनशील नसल्याची टीका केली.