वादळाचा तडाखा : पाच जनावरे मृत्युमुखी
By Admin | Published: June 6, 2014 01:10 AM2014-06-06T01:10:16+5:302014-06-06T01:10:16+5:30
अनेक ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट : घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर, धान्य भिजून मोठे नुकसान
सोलापूर : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वार्याचा पुन्हा तडाखा बसला़ यामध्ये नारी (ता़ बार्शी) येथील तुकाराम कदम यांच्या शेतात वीज पडून तेथील दोन म्हशी, आळसुंदे (ता. करमाळा) येथील सरवदे वस्तीवरील महादेव सरवदे यांची जर्सी गाय तर साकत येथील बाळू सपकाळ यांच्या गोठ्यातील पत्रे कोसळून दोन बोकडांचा बळी गेला़ असे जिल्ह्यात ठिकठिकाणच्या घटनेत पाच जनावरे मृत्युमुखी पडली़ अनेक ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट झाल्या़ ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले़ पावसामुळे धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे़
बार्शी : बार्शी शहर व तालुक्याच्या परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली असून, त्यात नारी येथील शेतकरी तुकाराम लक्ष्मण कदम यांच्या शेतात वीज पडून दोन म्हशी जागीच मयत होऊन जवळजवळ ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले तर तालुक्यात या वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे.
आज दुपारपर्यंत कडक ऊन पडले परंतु दुपारनंतर मात्र पावसाचे ढग जमा झाले व साडेसहाच्या सुमारास अचानक वादळी पावसास प्रारंभ झाला. त्यात नारी येथील शेतकरी कदम यांनी गावापासून अर्ध्या कि.मी. अंतरावरील शेतातील बाभळीच्या झाडाखाली बांधलेल्या म्हशी होत्या.
अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज खाली पडताच बांधलेल्या म्हशींनी हंबरडा फोडून जागीच मयत झाल्या. तर याच गावातील अनिल रानमाळ हरिभाऊ बदाले यांच्या कोठ्यावरील पत्रे वादळामुळे उडाले.
या वादळी पावसात शहरातील उपळाई रोड परिसरात दहा मिनिटे गाराचा पाऊस पडला. तर मळेगाव, महागाव, उपळे, बोरगाव, भातंबरे, इंदापूर, नारी, जामगाव (म.), पिंपरी (पान), तांबेवाडी, झाडी, लमाण तांडे तसेच खांडवी, पानगाव, उपळाई या परिसरात वादळी पावसाने हजेरी लावून या परिसरातील शेतातून पाणी वाहिल्याचे अनेक शेतकर्यांनी दूरध्वनीवरून सांगितले. तर गेले दोन दिवस या वादळी पावसाने हजेरी लावल्याने महामंडळाचे उपळे दुमाला उपकेंद्रातील वीजपुरवठा बंद पडल्याने त्या दोन दिवसांपासून भातंबरे, तांबेवाडी, उपळे, झाडी, लमाण तांडा परिसरातील वीज खंडित झाली़
सालसे : आळसुंदे (ता. करमाळा) येथील सरवदे वस्तीवरील महादेव संपत्ती सरवदे यांची ७० हजार रुपये किमतीची जर्सी गाय वीज पडून मृत्युमुखी पडली तर राहत्या घरावरील स्लॅपवर वीज पडल्याने महादेव सरवदे व पत्नी सरस्वती सरवदे व मुलगा राजेश सरवदे हे किरकोळ जखमी झाले आहेत. या नुकसानीचा पंचनामा घटनास्थळी जाऊन गाव कामगार तलाठी के. एम. कोंडलवाड व पशुधन पर्यवेक्षक धनंजय पाटील यांनी करून तहसील कार्यालयात सादर केला आहे.
या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्यांस तातडीने मदत मिळावी, असे निवेदन तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे सरपंच सदाशिव पाटील यांनी मागणी केली. साडे येथील राजेंद्र दादा लोंढे यांच्याही जर्सी गाय वीज पडून मृत्युमुखी पडली आहे.
साकत : बार्शी तालुक्यातील साकत येथे वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे घरांवरील पत्रे उडाले़ अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ घरावरील उडालेले पत्रे दोन बोकडांना लागल्याने ते मृत्युमुखी पडले़
साकतसह परिसरातील पिंपरी, हिंगणी, पिंपळगाव या गावांना वादळाचा तडाखा बसला़ साकत येथील सुशीला गायकवाड, संजय ननवरे, बाबासाहेब गायकवाड, कुमार गायकवाड, विठ्ठल अडसूळ, पांडुरंग अडसूळ, बाळासाहेब खटाळ, रामलिंग मोरे यांच्या घरावरील पत्रे उडाले़ बाळासाहेब खटाळ यांच्या किराणा दुकानावरील पत्रे उडाल्याने दुकानातील माल पावसाने भिजून मोठे नुकसान झाले़ घराच्या भिंतींना तडे गेल्याने ते बालंबाल बचावले़ त्यानंतर त्यांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आश्रय घेतला़ बाळू सपकाळ यांच्या गोठ्यातील पत्रे कोसळून दोन बोकडांचा बळी गेला़ तसेच पिंपरी, हिंगणी, पिंपळगाव येथीलही घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले़
क रमाळा : तालुक्यातील वांगीसह भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव, सांगवी,शेलगावसह पश्चिम भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यात केळीसह अन्य उभ्या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पश्चिम भागातील वांगी नं १ ते ३ मधील सोमनाथ नवनाथ रोकडे यांची २ एकर केळीची बाग वादळी वार्यामुळे भुईसपाट झाली आहे. सचिन रोकडे, नितीन रोकडे, सोेमनाथ निंबाळकर, युवराज निंबाळकर यांच्या केळीच्या बागा जमिनीवर पडल्या आहेत. नारायण रोकडे यांच्या घरावरील पत्र्याचे शेड उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.
पश्चिम भागातील झाडे, विजेचे पोल क ोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या आठवड्यात ही वादळ झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पुरवठा अद्यापही दुरुस्त झालेला नाही. आणखी भर पडल्याने अनेक भागात गेल्या आठवड्यापासून अंधार पसरलेला आहे. बुधवारी झालेल्या वादळाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे आज वांगी येथे गावकामगार तलाठी पांडेकर यांनी पंचनामे केले आहेत.
उपळेदुमाला : बार्शी तालुक्यातील उपळेदुमाला येथे बुधवारी झालेल्या वादळी तडाख्यात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले़ वार्याचा वेग इतका जबरदस्त होता की अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले़; मात्र जीवितहानी झाली नाही़
उपळेदुमाला येथील नेताजी चव्हाण यांच्या घरावरील पत्रे उडाले़ त्यामुळे घरातील मका, गहू प्रत्येकी १० पोती, ज्वारी १८ पोती व अन्य संसारोपयोगी वस्तू पावसाने भिजून अंदाजे एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले़ तसेच संतोष लोंढे, तात्यासाहेब पासले यांचेही नुकसान झाले़ या सर्व नुकसानीचे पंचनामे तलाठी आऱ पी़ जाधव यांनी केले़ नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय पासले यांनी केली आहे़
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील नाडी व मुंगशी परिसरात वादळी वारा व पावसाने केळीच्या बागा, पपईच्या बागांसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दि.४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानकच सुसाट्याचा वारा सुटला व जोरदार पाऊस झाला. यामुळे नानासाहेब साहेबराव काळोखे यांची ऐन भरात आलेली अडीच एकराची केळीची बाग जमीनदोस्त झाली, सुमारे २३५० झाडे उन्मळून पडल्याने सुमारे ६ ते ७ लाखांचे नुकसान झाले. रवी पाटील व तुकाराम काकडे यांच्या पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, अनेक पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर अनेक ठिकाणचे पत्रे उडाले.
मोडनिंब : बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्याने माढा तालुक्यातील सोलनकरवाडी व बावी येथील दोन शेतकर्यांची घरे उद्ध्वस्त झाली. घरांवरील पत्रेही उडून गेले.
वादळी वार्याने सोलनकरवाडी येथील मोहन शाहूराव मोरे यांचे घर जमीनदोस्त झाले. त्यामध्ये कपडे, संसारोपयोगी साहित्य, धान्य, खतांचे पावसाने भिजून नुकसान झाले. यामुळे दीड लाखाचे नुकसान झाले.
बावी येथील अभिमान भानुदास माळी यांच्या घराचे पत्रे उडून गेले. या अपघातात पाय मोडला. शासन मदत मिळेपर्यंत या शेतकर्यांना उघड्यावरच रहावे लागणार आहे. घरातील कपडे वार्याने उडून गेल्याने व धान्य पावसाने भिजल्याने त्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
---------------------------
५० वर्षांपूर्वीची झाडे पत्त्यासारखी कोसळली
सालसे परिसरातील सालसे, साडे, आळसुंदे, निंभोरे, वरकुटे, नेरले, आवाटी, घोटी, पाथुर्डी परिसरात सुसाट वार्यासह विजेच्या कडकडाटासह गारांचा तासभर पाऊस पडला. वादळी वार्यामुळे घरावरील पत्रे, छप्पर व जुनी ५० वर्षांपूर्वीची बाभुळ, लिंब, वड, चिंच, पिंपळाची वृक्ष पत्त्यासारखी कोसळली. साडे ते शेलगाव रस्त्यावरील पिंपळाचे मोठे झाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
वरवडेत पत्रे उडाले; कुटुंब उघड्यावर
करमाळा तालुक्यातील वरवडे येथे वादळी वार्यामुळे तीन घरांवरील पत्रे उडाले़ दोन घरांच्या भिंती पडल्या़ मात्र यात जीवितहानी झाली नसली तरी ती कुटुंबे उघड्यावर आली आहेत़ वादळी वार्यात घरावरील पत्रे उडून नुकसान होण्याची वरवडे येथील ही दुसरी घटना आहे़ चंद्रहार पवार, किसन थोरे, धनंजय पाटील यांच्या घरावरचे पत्रे उडाले़ तर अरुण मेणकुदळे, रमेश गायकवाड यांच्या घराच्या भिंती पडल्या आहेत़ अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ या घटनेचा पंचनामा तलाठी उमेश बनसोडे, ग्रामसेवक मोहिते यांनी केला़