पंढरपुरात वादळाने हाहाकार
By Admin | Published: May 27, 2014 01:15 AM2014-05-27T01:15:11+5:302014-05-27T01:15:11+5:30
कासेगावात वीज पडून ११ शेळ्या दगावल्या; मगरवाडीत पत्र्यावरील दगड पडून तिघे जखमी
पंढरपूर : जोरात सुटलेल्या वादळ वार्यात अचानक ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसळल्याने कासेगाव शिवारात ११ शेळ्या जागीच दगावल्या तर मगरवाडीत घरावरील पत्रे उडून गेल्याने अंगावर दगड पडून तिघे जखमी झाले. या घटना सोमवारी दुपारी चाडेचार ते साडेपाचच्या दरम्यान पंढरपूर तालुक्यात घडल्या. पंढरपूरच्या जुन्या दगडी पुलाजवळील झाड रस्त्यावर पडल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती तर विजेच्या तारा तुटल्याने सायंकाळच्या सुमारास शहरात अंधार पसरला होता. देशात मान्सूनचे आगमन होण्याच्या बातम्या येत असताना पंढरपूर तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वार्याच्या पावसाने कहरच केला. कासेगावच्या इनामदार वस्तीवरील अजाम इस्मुद्दीन इनामदार यांच्या शेळ्या शिवारात चरत असताना अचानक वीज कोसळल्याने जागीच दगावल्या. वीज कोसळताच परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले. मगरवाडीत झालेल्या वादळी वार्यामुळे मारुती कांबळे, अभिमान कांबळे, गोवर्धन कांबळे, पांडुरंग भोसले, नवनाथ बाबर, नागनाथ गायकवाड, अण्णा रोकडे व मधुकर सुतार यांच्या घरावरील उडाले. पत्रे उडून गेल्याने पत्र्यावर ठेवलेले दगड पडून बालाजी चव्हाण, मधुकर सुतार व बापूराव हे जखमी झाले. मधुकर सुतार यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने टी. व्ही., कपाट, संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. जखमींवर पेनूर व तारापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वादळी वार्यामुळे शेतातील पिकांसह झाडेही जमीनदोस्त झाली. पावसाचा जोर, मगरवाडी, तारापूर, सुस्ते, पंढरपूर शहर परिसरात चांगलाच होता.
------------------------ ‘
विठ्ठल’ची साखर भिजली
विठ्ठल कारखाना परिसरात झालेल्या वादळी वार्यामुळे गोदामावरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात साखरेची पोती भिजून नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी गोदामात आल्याने गोदामाला तळ्याचे स्वरूप आले होते. शहरातील विद्युत तारा तुटल्याने तासभर वीजपुरवठा खंडित होता तर झाडे पडल्याने जुन्या दगडी पुलावर वाहतूक खोळंबली. मंदिराचा फलकही तुटला पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावरील नामनिर्देशक फलकही प्रचंड वादळी वार्याने तुटला आहे. यावरील मंदिरावरील म शब्द तुटून लोंबकळत आहे. मंदिरावरील काही ध्वजाचेही नुकसान झाले आहे. वाखरी भोसले कोल्ड स्टोअरेजच्या बाजूला असलेले झाड विजेच्या मुख्य वाहिनीवर कोसळल्याने वाखरीसह इसबावी परिसरातील वीजपुरवठा बंद झाला आहे. दुरुस्तीला विलंब होणार असल्याने हा विद्युतपुरवठा २४ तास बंदच राहणार आहे. -
------------------------- चिंचोलीत पत्रे उडाले; वीजपुरवठा खंडित
चिंचोली-भोसे (ता. पंढरपूर) येथे अचानक आलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. रामचंद्र भिवाजी पवार, सतीश तुकाराम पवार, सिद्धेश्वर गजेंद्र पवार, भारत भुसे यांच्या घरावरील पत्रे उडाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच जि. प. प्राथमिक शाळेवरीलही सर्व पत्रे उडून गेले आहेत. विजेचे पोल रस्त्यावर पडल्यामुळे गावातील वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित झाला आहे. ऊस व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळ वार्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे व घर पडझडीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी सोसायटीचे अध्यक्ष गणपत गायकवाड यांनी केली आहे