अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; तुटलेला कान पिशवीत घेऊन पालक इस्पितळात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:38 PM2018-08-31T15:38:23+5:302018-08-31T15:40:12+5:30
माणकेश्वर गावातील ताहेर बादेला असे या दीड वर्षाच्या बालकाचे नाव असून त्याची आई तुटलेल्या कानासह ताहेरला घेऊन शासकीय इस्पितळात आली होती.
सोलापूर : येथील बार्शी तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याला आपले कान गमवावे लागले आहेत. माणकेश्वर गावातील ताहेर बादेला असे या दीड वर्षाच्या बालकाचे नाव असून त्याची आई तुटलेल्या कानासह ताहेरला घेऊन शासकीय इस्पितळात आली होती.
राज्यभरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. ताहेर हा आपल्या अंगणामध्ये खेळत होता. त्याची आई घरकाम करण्यात गुंग होती. एवढ्यात ताहेरच्या जोरजोरात रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. यामुळे ती हातातील काम टाकून बाहेर आली. अंगणात ताहेरवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. तिने कुत्र्याला हिसकावून लावले. मात्र, या झटापटीत कुत्र्याने ताहेरचा कान तोडला होता. रक्तबंबाळ झालेल्या ताहेरला तसेच उचलत त्याचा तुटलेला कान घेऊन तिने तात्काळ सरकारी इस्पतळ गाठले.
तुटलेला कान जोडता येईल या आशेने ताहेरच्या आईने कान आणला होता. मात्र, कान जोडता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्या तिला धक्का बसला आहे. ताहेरच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्याने त्याला आणखी आठवडाभर इस्पितळात ठेवण्यात येणार आहे. तसेच ताहेरच्या कानावर प्लॅस्टीक सर्जरी करता येऊ शकते का याचाही विचार डॉक्टरांकडून सुरु आहे.