सोलापुरात तणावपूर्ण शांतता

By Admin | Published: June 9, 2014 01:11 AM2014-06-09T01:11:30+5:302014-06-09T01:11:30+5:30

महापुरुषांचा अवमान : दगडफेक, जाळपोळीच्या किरकोळ घटना

Stressful silence in Solapur | सोलापुरात तणावपूर्ण शांतता

सोलापुरात तणावपूर्ण शांतता

googlenewsNext


सोलापूर : फेसबुकवर महापुरूषांच्या झालेल्या विटंबनेमुळे सोलापूर शहरात ठिकठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पार्क चौकात ईरप्पा गुमडेल या दुकानावर काही तरूणांनी दगडफेक केली तर सम्राट चौक येथील श्राविका प्रशालेसमोर अज्ञात तरूणांनी कार जाळून संताप व्यक्त केला.
शनिवारी फेसबुकवर महापुरूषांचे विचित्र फोटो टाकून विटंबना केली होती. याचे पडसाद रविवारी सकाळी हळूहळू उमटण्यास सुरूवात झाली. बाळीवेस, कस्तुरबा मंडई येथे किरकोळ पळापळी झाली, त्यानंतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. शिवाजी चौकात सकाळी एका एस.टी.ची काच फोडण्यात आली, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ९.३0 वा. एस.टी. आगारातील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. विजापूर रोडवरही तणाव निर्माण झाल्याने दुकाने बंद करण्यात आली. परिस्थिती लक्षात घेता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सम्राट चौक येथील श्राविका प्रशालेसमोर लावण्यात आलेली कार (क्र.एम.एच.१0 बी.एम.३६२९) दुपारी ३ वा. अचानक पेटवुन देण्यात आली. अजितकुमार जिनगोंडा बेडकीहाळे (वय-५१, रा. वृदांवन विलास, औजस स्फूर्ती चौक, सांगली) हे आपल्या शिक्षण घेत असलेल्या मुलीला घेऊन जाण्यासाठी सोलापूरला आले होते. श्राविका आश्रमातील पाहुण्यांना भेटण्यासाठी आले असता हा प्रकार घडला. यामध्ये २0 हजार रूपये किमतीचा मोबाईल आणि कपडे जळून खाक झाले. आग लागल्याचे समजताच तत्काळ जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धांडेकर हे पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी आले. तत्काळ अग्निशामक दलाच्या वतीने कारला लागलेली आग विझविण्यात आली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पार्क चौकातील इरनप्पा गुमडेल अ‍ॅन्ड कंपनी या कपड्याच्या दुकानावर अचानक आलेल्या काही तरूणांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यात दुकानाची फाच फुटून नुकसान झाले. दगडफेक होत असल्याची माहिती कळाल्याने काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यात धन्यता मानली.
पार्क चौकात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचे कळताच फौजदार चावडीचे पोलीस पथक तेथे दाखल झाले. तोपर्यंत दुचाकी वाहनावरून येऊन दुकानांवर दगडफेक करणारे टोळके पसार झाले. काही वेळाने परिस्थिती पूर्ववत झाली.
---------------------------
टोळके आले की बंद
शहरात काही ठिकाणी तरूणांचे टोळके आले की दुकानदार आपल्या दुकानाचे शटर पटापट बंद करीत होते. ते गेले की पुन्हा चालू करीत होते.
------------------------
बसस्थानकावर ४०० प्रवासी अडकून पडले
महापुरुषांविषयी अवमानकारक मजकूर आणि छायाचित्र फेसबुकवर टाकताच शहरातील काही समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. संतप्त झालेल्या जमावाने शिवाजी चौक आणि परिसरातून येणाऱ्या एस. टी. बसवर दगडफेक करण्यात सुरूवात केली. ही वार्ता समजताच राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने एस. टी. गाड्या आगाराबाहेर न सोडण्याचे आदेश दिले. आगारातून बाहेर पडणाऱ्या गाड्या जागीच थांबवण्यात आल्या. त्यामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकातच ताटकळत बसावे लागले. ३00 ते ४00 प्रवासी स्टॅण्डवर अडकून पडल्याचे सांगण्यात आले. बसवर दगडफेकीच्या घटना घडत असल्याने शहर पोलिसांनी बसस्थानक आणि परिसरात चोख बंदोबस्त लावला.
--------------------------------------
अन् तणाव निवळला
सोशल मीडियावरील महापुरूषांच्या अवमानावरून दुपारी शहरात निर्माण झालेला तणाव सायंकाळच्या वेळी निवळला. सोलापुरात नॉर्थकोट मैदानावर एका मोठ्या विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या किरकोळ घटना विसरून वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने सोहळ्यास उपस्थित राहिले. शिवाय वरातही निघाली. याचबरोबर हिराचंद नेमचंद वाचनालयात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासही साहित्यरसिकांची मोठी गर्दी होती.

Web Title: Stressful silence in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.