पंढरपुरात कडक संचारबंदी; जागोजागी ग्रामीण पोलिसांचा आहे बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:27 PM2020-08-08T17:27:22+5:302020-08-08T17:30:18+5:30
पंढरपूर शहरातील रस्ते सामसूम; सात दिवसाच्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा सुरू
पंढरपूर : पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत. शहरात पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.
पंढरपुरातील नागरिकांनीही घरातच थांबून संचारबंदीच्या आजच्या पहिल्या व दुसºया दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, संचारबंदीची कडक अंमलबजावणीसाठी शहरात १३७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच २५० कोरोना वॉरियर्सचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात सात दिवसांच्या संचारबंदी कालावधीत दूध, हॉस्पिटल व मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. कवडे यांनी सांगितले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात रॅपिड अॅटीजेन टेस्टची मोहीम सुरु असून नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तालुक्यातील टाकळी येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. टाकळी हा परिसर पंढरपूर शहराला लागून असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात रॅपिड अॅटिजेन टेस्टची सुरुवात केली आहे. तालुक्यात आज एका दिवसात विविध गावांमध्ये ५०० रॅपिड अॅटिजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.
रॅपिड अॅटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी नागरिकांनी चिंतीत न होता रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. हे लक्षात घेवून रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर आणि कोरोनाची साखळी तोडण्यास अधिकाधिक भर देण्यात येणार असल्याचे घोडके यांनी सांगितले.