आज रात्रीपासून सोलापुरात कडक संचारबंदी; विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 02:34 PM2021-04-09T14:34:32+5:302021-04-09T14:35:10+5:30
चौकाचौकात असणार पोलिसांचा बंदोबस्त; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही असणार बंद
सोलापूर - शुक्रवारच्या रात्री आठ पासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसा करता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व दुकाने चालू राहतील मात्र सर्वसामान्य व्यक्तींना शहरात फिरता येणार नाही. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर संचारबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद केले जातील.
आज रात्री 8 :00 पासून पूर्ण शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून लोकांनी कारण असल्याशिवाय बाहेर पडू नये शहरात पोलीस चेकिंग होणार असून त्यांच्या चेकिंग च्या वेळेस योग्य तो कारण असेल तरच आपल्याला सोडले जाईल तसे नसेल तर त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल सोमवारी सकाळी सात पर्यंत संचार बंदी असल्याने नागरिकांनी घरीच सुरक्षित रहा. शनिवार व रविवारी संचारबंदी मध्ये सोलापूर शहर परिसरात अत्यावश्यक सेवेमध्ये मुभा देण्यात आलेल्या दुकानदार, रिक्षा चालक, डिलेवरी बॉय, कारखानदार येथील काम करणाऱ्या व्यक्तींना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.
दरम्यान, संबंधित अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपली करोना चाचणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात लावणे बंधनकारक असणार आहे. निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्यांच्यावर शासनाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली. आज रात्री आठपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली असून त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील बाकी सर्व बंद असणार आहे तसेच नागरिकांनी कारण असेल तरच बाहेर पडा कारण नसेल तर घरी थांबा विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले.