पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यावर कडक लॉकडाऊनची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:47+5:302021-05-08T04:22:47+5:30
कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोन हजार जणांना आपला प्राण गमवावा ...
कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोन हजार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. बाधित रुग्णसंख्या सापडण्याची मोहीम फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असली तरी दुसऱ्या लाटेला प्रशासन, राजकीय नेत्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. या काळातच पंढरपूर, मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. प्रत्यक्ष निवडणूक १७ एप्रिलला झाली असली तरी याची तयारी मात्र फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाली होती. या कालावधीत दोन्ही तालुक्यात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मतदारांच्या गाठीभेटी, मोठ्या नेत्यांचे दौरे कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नियमितपणे सुरू होते.
६ एप्रिल २०२१ पूर्वी पंढरपूर तालुक्यात अवघे ९ हजार २६० ॲक्टिव्ह रुग्ण होते. २५५ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर मंगळवेढा तालुक्यात अवघे २०६० ॲक्टिव्ह रुग्ण होते, तर ५२ जणांना प्राण गमवावे लागले होते. हीच आकडेवारी १७ एप्रिल २०२१ या निवडणुकीच्या दिवसापर्यंत वेगाने वाढली. त्यामध्ये ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १० हजार ६८०, तर मृत्यूचे प्रमाणे २६५ पर्यंत गेले होते. मंगळवेढा तालुक्यात ही रुग्ण संख्या वाढून २६०० वर पोहोचली तर मृत्यूही ७० च्या आसपास होते. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध घातले. कोरोना चाचण्या वाढविल्या. दररोज दोन्ही तालुक्यांत मिळून जवळपास तीन हजार रुग्णांच्या चाचण्या होऊ लागल्या. त्यामुळे रुग्णवाढीचा वेगही त्याच पटीत वाढला. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-----
महिन्यात दोन्ही तालुक्यात सापडले १८ हजार रुग्ण
पंढरपूर, मंगळवेढा पोटनिवडणूक झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यात गेल्या वर्षभरात जेवढे रुग्ण सापडले नाहीत त्याच्या किती तरी पटीने रुग्णसंख्या वाढून अवघ्या एक महिन्यात १३ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढून ती १६ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. पंढरपुरातही निवडणुकीपूर्वी दहा हजाराच्या आसपास असलेली रुग्णसंख्या ७ हजार ५०० ने वाढून ती १७ हजारांवर गेली. त्यामुळे दोन्ही तालुक्यांत मिळून १८ हजार नव्याने रुग्ण सापडले आहेत. मंगळवेढ्याची मृत्यूसंख्या दुपटीने वाढून ११५ पर्यंत पोहोचली. तर पंढरपुरातील मृत्यूचे प्रमाणही ३३५ वर पोहोचले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जवळपास १२५ जणांवर आपला प्राण गमावण्याची वेळ आली आहे.
प्रचारसभांमुळे भडकला जिल्ह्यात कोरोना
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मंगळवेढ्याची एकमेव पोटनिवडणूक सुरू असल्याने महाविकास आघाडीसह भाजपकडून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय नेते या दोन्ही तालुक्यांत ठाण मांडून प्रचार करत होते. परजिल्ह्यातूनही दोन्ही पक्षांकडून शेकडो कार्यकर्ते, मंत्री, मोठे पदाधिकारी येत होते. हा प्रकार जवळपास एक महिना सुरू असल्याने काही कोरोनाबाधित रुग्ण या तालुक्यात यायचे तर काही जण इथला कोरोना घेऊन जिल्ह्यातील इतर तालुक्यात व परजिल्ह्यात घेऊन जात होते. त्यामुळे कोरानाचा संसर्ग प्रचारसभांमुळे प्रचंड वाढला आणि त्याचा फटका आता जिल्हाबंदी करण्यापर्यंत येऊन ठेपला आहे.
-----
पंढरपूर, मंगळवेढा व परिसरातील तालुक्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत आहे. या तालुक्यात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचे नातेवाईक नियम पाळत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे अख्खी घरे बाधित होत आहेत. कोरोना रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक सुपर स्प्रेडर ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर