कडक निर्बंध; राज्याच्या पाच तर सोलापूर जिल्ह्याच्या २३ ठिकाणी असणार नाकाबंदी
By Appasaheb.patil | Published: April 23, 2021 06:25 PM2021-04-23T18:25:13+5:302021-04-23T18:25:19+5:30
सोलापूर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर पोलिसांचा असणार वॉच
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर केले आहेत. नव्या आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विनापरवाना प्रवास करता येणार नाही. त्याच दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राज्याच्या ५, तर जिल्ह्याच्या २३ अशा एकूण २८ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. शिवाय मोठ्या शहरातील प्रत्येक चौकावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून नियम तोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मागील काही दिवसांपासून राज्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यू दरातही वाढ होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. ‘ब्रेक द चैन’अंतर्गत विविध आदेश पारित करण्यात आले असून त्यानुसार संपूर्ण राज्यात कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व अन्य कर्मचाऱ्यांना राज्य किंवा जिल्हा प्रशासनाकडून पासेस दिले आहेत. पासेस असतील तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. अन्यथा कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शक्यतो नागरिकांनी प्रवास करू नये, नियमांचे पालन करावे अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिला आहे.
-------------
याठिकाणी असेल कडक नाकाबंदी...
- आंतरराज्य नाकाबंदी
पोलीस ठाणे नाकाबंदी ठिकाण
- अक्कलकोट उत्तर - वागदरी (कर्नाटक राज्य)
- अक्कलकोट दक्षिण - दुधनी (कर्नाटक राज्य)
- मंगळवेढा - कात्राळ-चडचण (कर्नाटक राज्य)
- मंद्रुप -टाकळी-नांदणी, सादेपूर (कर्नाटक राज्य)
----------
आंतरजिल्हा नाकाबंदी
पोलीस ठाणे नाकाबंदी ठिकाण
- टेंभुर्णी - भीमानगर (पुणे)
- अकलूज - सराटी (पुणे)
- नातेपुते -शिंगणापूरपाटी (सातारा)
- सोलापूर तालुका - बोरामणी, तामलवाडी (उस्मानाबाद)
- पांगरी - येडशी, पिंपळवाडी येरमाळा (उस्मानाबाद)
- करमाळा - जातेगाव (अहमदनगर), कोंढार -चिंचोली-राशीन (अहमदनगर), आवाटी ते परंडा (उस्मानाबाद)
- माळशिरस - पिलीव, जळभावी घाट (सातारा), सांगोला -जुनोनी, शेरेवाडी-कटफळ, जत ते सानंद (सांगली).
- मंगळवेढा -सोड्डी-उमदी (सांगली)
- कुर्डूवाडी - लव्हे ते परंडा, मुंगशी ते परांडा (उस्मानाबाद)
- वैराग -गौडगाव, धामणगाव ते काटी (उस्मानाबाद)
- बार्शी तालुका - वारदवाडी (उस्मानाबाद)
------------
प्रत्येक चौकावर असणार विशेष लक्ष
ग्रामीण भागातील बार्शी, पंढरपूर, करमाळा, माढा, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा आदी मोठ्या शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या चौकात पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय गाडीही जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाकडून कडक नाकाबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कडक संचारबंदीमधील सर्व नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक सेवेतील लोकांशिवाय कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. परराज्य व परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोरोनाला संपविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- तेजस्वी सातपुते,
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण