सोसायट्यांच्या ठरावासाठी आजी-माजींची जोरदार फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:27+5:302021-08-25T04:27:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निमित्तानं सोसायट्यांची ठराव गोळा करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तालुक्यातील वातावरण तापले आहे.
बार्शी तालुक्यात विविध कार्यकारी सोसायट्यांचे ठराव घेण्यासाठी आजी-माजी आमदारांच्या गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. गेले पंचवीस वर्षांपासून बार्शी तालुक्यातील सहकारी संस्थांवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आ. दिलीप सोपल यांचे वर्चस्व आहे. जिल्हा सहकारी दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, संतनाथ सहकारी साखर कारखाना, तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायट्या, आदी ठिकाणी सोपल यांची एकहाती सत्ता होती.
मात्र, मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत आ. राजेंद्र राऊत यांनी सोपल गटाचा पराभव करून पहिल्यांदाच एखादी सहकारी संस्था ताब्यात घेतली. मागील पाच वर्षांत झालेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांत राऊत गटाने प्रथमच भाग घेऊन काही सोसायट्यांच्या निवडणुका जिंकल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून जिल्हा बँकेवर प्रशासक आहे. त्याचा फायदा घेत आ. राऊत यांनी बँकेत जाणे-येणे सुरू केले. बाजार समितीच्या ठेवीही बँकेत ठेवल्या. तत्पूर्वी त्यांनी बँकेच्या कारभाराबाबत आवाज उठवून प्रशासक आणण्याच्या प्रक्रियेत ही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
---
सोसायट्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न
बार्शी तालुक्यात १३५ विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीच्या संचालकांमधून एकाला मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव करून तो सहायक निबंधक कार्यालयाकडे पाठवायचा असतो. १६ सप्टेंबर ही त्यासाठी अंतिम तारीख आहे. माजी आ. दिलीप सोपल व आ. राजेंद्र राऊत या दोन्ही गटांनी मागील आठवड्यापासून यासाठी हालचाली सुरू करून आपल्या कार्यकर्त्याच्या नावाचा ठराव करून घेण्यासाठी भेटी-गाठी घेण्याचे काम सुरू केले आहे.
---