साखर कारखान्यांद्वारे वीज बिल वसुलीला तीव्र विरोध; शुक्रवारी मनसेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 03:51 PM2021-01-23T15:51:03+5:302021-01-23T15:51:10+5:30
पंढरपूर : वीज बिल माफीसाठी २९ जानेवारीला मनसे काढणार मोर्चा
पंढरपूर : बारामती वीज परिमंडळ विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून वीज बिल वसुलीचा नवा फंडा अंमलात आणण्याचा विचार सुरू केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या वीज बिल वसुलीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. साखर कारखान्यांनी वीज बिल वसुली करून देण्याचा साधा विचार जरी केला तरी साखर कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. या पार्श्वभूमीवर २९ जानेवारी रोजी पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी दिलीप धोत्रे म्हणाले की, वीज बिल वसुलीवरून येत्या काही दिवसात सरकार आणि मनसेमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अनेकांचा रोजगार गेला आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातच सडून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे वीज बिल माफ करून दिलासा देण्याची गरज आहे.
ऊर्जामंत्री आणि सरकारमधील इतर मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीच वीज बिलाबाबत परस्पर विरोधी विधाने करू लागले आहेत. यामध्ये सर्वसामान्य लोकांची कोंडी झाली आहे. कोरोना काळात वीज बिलात सवलत देऊ म्हणणारे सरकार आता वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद करू, अशी धमकी देत आहेत, परंतु सरकारच्या अशा धमक्यांना शेतकरी भीक घालणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
२९ जानेवारी रोजी हजारो शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली तातडीने थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मनसेच्या वतीने पत्रकार दिन आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्रकारांना तीळगूळ वाटप करून सन्मान केला. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, नागेश इंगोले, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अनिल बागल, कृष्णा मासाळ, महेश पवार,सागर बडवे, पुजारी, शुभम काकडे आदी उपस्थित होते.
तर ‘त्या’ कारखान्यांच्या दारात आंदोलन करू...
वीज वितरण कंपनी आणि साखर कारखानदारांमध्ये वसुलीसाठी साटेलोटे सुरू आहे. राज्यातील एकाही साखर कारखान्यांनी वीज बिल वसुलीचा ठेका घेतला तरी त्या-त्या साखर कारखान्यांच्या दारात बसून आंदोलन करू. साखर कारखान्यांनी आधी शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे द्यावेत मगच वीज वितरण कंपनीच्या बिल वसुलीचा ठेका घ्यावा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज बिलाचा एक रुपयाही वसूल केला तरी कारखाने बंद पाडू, असा इशाराही यावेळी दिलीप धोत्रे यांनी दिला.