संघर्षशील नेतृत्व : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:13+5:302021-09-04T04:27:13+5:30
सत्त्वशील, सदाचरणी वडिलांचा कर्तबगार मुलगा म्हणून सुशीलकुमारजी शिंदे यांचा जीवनपट एक आख्यायिका व्हावी असाच आहे. त्यांचा जन्म ४ ...
सत्त्वशील, सदाचरणी वडिलांचा कर्तबगार मुलगा म्हणून सुशीलकुमारजी शिंदे यांचा जीवनपट एक आख्यायिका व्हावी असाच आहे. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ चा. सन १९४१ स्वातंत्र्य आंदोलनाने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक आणि शिखरस्थ ठिकाणी नेले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची परवड झाली. ही परवड शिंदेसाहेब एल. एल. बी. उत्तीर्ण झाल्यानंतर थांबली. सन १९६५ रोजी मुंबई सीआयडीमध्ये शिंदेसाहेबांची उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली. १ मे १९६९ रोजी उज्ज्वलाताईंशी विवाह झाला.
त्याचदरम्यान काँग्रेसी राजकारणात तरुण पिढीचे नेते शरद पवार यांची मैत्री पक्की झाली. मैत्रीने संसदीय राजकारणात आणले. काँग्रेस सोशालिस्ट फोरम ॲक्शनचे निमंत्रक म्हणून महाराष्ट्रात जो धडक दौरा केला, त्यांना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, भटके विमुक्त जीवनाचे विदारक दर्शन झाले. १९७२ च्या पार्श्वभूमीवरचा भीषण दुष्काळी दौरा यांची वर्गीयदृष्टी पक्की करून गेला. गरिबांच्या जगण्या-मरण्याच्या असंख्य प्रश्नांनी त्यांच्या मनात कोलाहल सुरू झाला. शिंदेसाहेबांची लोकविलक्षण धडाडी आणि कार्यक्षमता पाहून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरविले. अटीतटीच्या सामन्यात शिंदेसाहेब भरघोस मतांनी निवडून आले आणि या केवळ चार महिन्यांतच वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून शिंदेसाहेबांचे नेतृत्व सातत्याने व्यापक होत राहिले. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार आदी दिग्गज नेत्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदे त्यांनी भूषविली. त्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी लोकहिताचे प्रश्न तळमळीने धसास लावले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी विकासकामांना चालना दिली. जिल्ह्याचा कायापालट केला.
शिवयोगी परब्रह्म श्री सिद्धरामेश्वरांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद आहे. पंचेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत उजनी जलाशयापासून एन.टी.पी.सी.च्या मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती केंद्रापर्यंत एकही प्रश्न त्यांनी वगळला नाही.
खासदार म्हणून काम करण्यासाठी जी जी संधी त्यांना मिळाली त्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. राज्यसभेत जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न मांडणारा खासदार म्हणून त्यांना लागोपाठ चार वर्षे पुरस्कार मिळाले. यापैकी एक पुरस्कार मदर तेरेसा यांच्या हस्ते स्वीकारण्याचे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले. पक्षीय स्तरावर राज्यसभा व लोकसभेत त्यांची कामगिरी उठावदार असल्यामुळेच त्यावेळी परराष्ट्र व्यवहार विभागाची (फॉरेन अफेअर सेल) जबाबदारी शिंदेसाहेबांकडे सोपविण्यात आली. भारताचे संबंध सर्व राष्ट्रांशी स्नेहाचे रहावेत, हे कार्य शिंदेसाहेबांनी मोठ्या कौशल्याने सांभाळले. म्हणून चीन, कोरिया, रशिया, अमेरिका आदी प्रमुख राष्ट्रांना पक्षाचे जे शिष्टमंडळ गेले होते त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी शिंदेसाहेबांवर सोपविण्यात आली. एक प्रगल्भ राष्ट्रीय नेता म्हणून सगळा देश त्यांच्याकडे आज पाहतो आहे.
शिंदेसाहेबांचे जीवन घनघोर वादळाने भरलेले आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना त्यांची पत्नी उज्ज्वलाताई आणि कन्या प्रणितीताई यांनी विलक्षण साथ दिली. त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध सर्वार्थाने समृद्ध केला. मात्र, शिंदेसाहेबांची खरी ताकद त्यांच्या आत्मविश्वासात सामावलेली आहे. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! शुभकामना!
-हाजी अलहाज मैनोद्दिन शेख
उपाध्यक्ष, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी