सोप्या पध्दतीने बहुपर्यायी प्रश्न विचारून अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या परीक्षा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 03:49 PM2020-09-09T15:49:02+5:302020-09-09T15:49:09+5:30
उदय सामंत यांची माहिती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संशोधन अहवालाचे प्रकाशन
सोलापूर : महाराष्ट्राचे शिक्षण धोरणही देशाला दिशादर्शक ठरेल. आज कठीण प्रसंग असले तरीही अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने बहुपयार्यी प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. यासंदर्भात काही ठिकाणी आता समुपदेशनाची व्यवस्था केली जात आहे, ते करणे आवश्यकच आहे. येता काळात सोलापूर विद्यापीठासाठी भरपूर सहकार्य राहील, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी मार्च ते आॅगस्ट 2020 या कालावधीतील कोरोना व लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला व विद्यार्थ्यांच्या आनंदाचा पातळीचा अभ्यास केलेला असून या संशोधन अहवालाचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते आॅनलाइन झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले. या संशोधनाबद्दल डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी माहिती दिली.
मंत्री सामंत म्हणाले की, कठीण प्रसंगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संशोधकांनी पुढाकार घेऊन चांगले संशोधन केले. याचा फायदा देशाला होईल. कोरोनाचे संकट असले तरीही, यातून मार्ग काढत पुढे जायचे आहे. नवे शिकायचे आहे, संकटावर मात करून यशस्वी व्हायचे आहे. अशाही परिस्थितीत चांगला अभ्यास विद्यापीठाकडून झाला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक बाबींची अंमलबजावणी सोलापूरसह राज्यातील अनेक विद्यापीठे करीत आहेत.
कोरोना संकटकाळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या पातळीचा अभ्यास हा निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्याचे जीवन हे आनंदी राहिले पाहिजे. त्याचे संशोधन होणे महत्त्वाचे होते, सोलापूर विद्यापीठाचे हे संशोधन महाराष्ट्राला नव्हे तर देशातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.