विद्यार्थी घरीच ऑनलाईन शिक्षणात रमले, शाळा बनल्या साप-विंचवांचे माहेरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:57+5:302021-09-15T04:26:57+5:30
पंढरपूर : कोरोनाचे संकट असल्यामुळे मुलांना शाळेत न बोलवता ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मागील दोन वर्षांपासून शाळा प्रत्यक्षरित्या ...
पंढरपूर : कोरोनाचे संकट असल्यामुळे मुलांना शाळेत न बोलवता ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मागील दोन वर्षांपासून शाळा प्रत्यक्षरित्या बंद आहेत. यामुळे शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरून मुलांचे भविष्य घडविणाऱ्या शाळा आता साप-विंचवांचे माहेरघर बनल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यामधील ११ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २७९७ शाळा आहेत. या सर्व शाळेत एकूण २ लाख १ हजार ४२४ विद्यार्थी आहेत. परंतु सध्या कोरोनाचे संकट आवासून उभे आहे. यामुळे मागील दोन वर्षांपासून मुलांना शाळेत न बोलवता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. यामुळे शाळेत मुलांची आवक नसून परिणामी शाळांंची योग्यती स्वच्छता होताना दिसून येत नाही. काही शाळेच्या आवारात कचरा साठला आहे. तर काही शाळेच्या आवारात झुडपे वाढली आहेत. दरवाजे, खिडक्या खराब झाल्या आहेत. यामुळे शाळेत साप विंचवांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शाळेची रंगरंगोटी करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी का होईना, शाळा मात्र, टापटीप ठेवण्यात येत आहेत.
...........
तालुका/शाळा संख्या/शिक्षक संख्या
अक्कलकोट / २५२/ १०६४
बार्शी /१७९/ ६१३
करमाळा/२२७/ ७७४
माढा /२९५/ ९६८
माळशिरस /३९३/ १३०९
मंगळवेढा /१८३/ ६३५
मोहोळ / २४८/ ९४८
पंढरपूर / ३३८/: १०४१
सांगोला / ३८९/ १०६२
उत्तर सोलापूर /१००/ ४२८
दक्षिण सोलापूर /१८८/ ८७८
...............
वर्गखोल्यांमधील धूळ हटेना
शाळेचे दरवाजा व खिडक्या खराब झाल्या आहेत. त्याचबरोबर शाळा बंद असल्यामुळे वेळेवर स्वच्छता होत नाही. यामुळे वर्गखोल्यांमध्ये धूळ साठल्याचे दिसून येत आहे.
............
जबाबदारी मुख्याध्यापकांची
शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे. शाळेची स्वच्छता मुख्याध्यापक बाहेेरच्या यंत्रणेमार्फत करून घेत असतात, अशी माहिती दिली.
रोज असते ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक ९ हजार ७२० आहेत. शाळा बंद असल्या तरी ५० टक्के शिक्षकांना शाळेत जावे लागते. शाळेतील शिक्षक उपस्थितीचा आढावा केंद्र प्रमुखांमार्फत तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी घेत आहेत.
-संजय जावीर, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग
.............
फोटो : शाळेच्या परिसरात साठलेला कचरा
फोटो : शाळेच्या खिडक्यांचे दरवाजे खराब झालेले आहेत.