सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आजही गणवेशापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 06:25 PM2019-06-20T18:25:02+5:302019-06-20T18:27:12+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाला नाही;शिक्षकांकडून तक्रारीचा पाऊस
सोलापूर : शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके व गणवेश देण्याचे आदेश देऊनही शाळा सुरू होऊन चार दिवस झाले तरी झेडपी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या मुली व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश पुरविले जातात. शाळा सुरू होण्याअगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी शिक्षण विभागाची बैठक घेऊन गणवेश खरेदीच्या खर्चाला मंजुरी दिली होती. यावर्षी डीबीटी ( थेट लाभार्थीच्या खात्यावर पैसे) रद्द करून गणवेश खरेदीचे अधिकार शालेय समिती व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.
समितीने स्थानिक स्तरावर गणवेश खरेदी करावेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. अद्याप गणवेशासाठी शासनाकडून अनुदान आलेले नाही. शालेय समितीने व्यवस्था करावी अशा सूचना दिलेल्या असताना गणवेश खरेदी झालेलीच नाही. यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेतील अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटक्या जाती-जमाती मुलांना व सर्व संवर्गातील मुलींना मोफत गणवेश देण्यासाठी प्रती विद्यार्थी ६00 रुपये अनुदान दिले जाते.
उन्हाळी सुटीपूर्वीच अनुदानाची मागणी करूनही अनुदान दिले नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. आता अनुदान कधी येणार व बाजारपेठेत इतके गणवेश कसे उपलब्ध होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.