सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी मिळणार लॉकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 12:41 PM2021-05-27T12:41:56+5:302021-05-27T12:42:02+5:30
दीड कोटी खर्च : ५३७ शाळांमध्ये होणार लवकरच सोय
सोलापूर : कोरोना महामारीमुळे शाळा सुरू नसल्या तरी आगामी काळात वर्ग सुरू झाल्यावर झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात दप्तर ठेवण्यासाठी प्लास्टिकचे लॉकर पहावयास मिळणार आहेत.
नावीन्यपूर्ण योजनेतून झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी प्लास्टिकचे लॉकर खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत. २७ जानेवारी रोजी जिल्हा नियाेजन समितीने या खर्चाला मंजुरी दिल्यावर जिल्हा परिषदेने असे प्लास्टिकचे लॉकर खरेदीसाठी ऑनलाइन निविदा जारी केली. या निविदेत मुंबईच्या तृप्ती उद्योग (प्रतिनग लॉकर : ३०७९०), सोलापूरच्या वरद एन्टरप्रायझेस (२७७२०), पुण्याच्या शुभ्रा (२९०७०), सारथी (२९८००) या चार संस्थांनी सहभाग नोंदविला. यात पुण्याच्या सारथी इंडस्ट्रीजची निविदा अपात्र ठरली. इतर तीन निविदांपैकी वरदची किमत कमी असल्याने या संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या ऑनलाइन सभेत या निविदेला मंजुरी देण्यात आल्यावर आता वर्कऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार १ कोटी ४८ लाख ८५ हजारांचे ५३७ प्लास्टिक लॉकर पुरवठा केले जाणार आहेत. लॉकर उपलब्ध होईल तसे शाळांना पाठविण्यात येणार आहेत. कोरोनामुळे सध्यातरी शाळा सुरू नाहीत. त्यामुळे या लॉकरचे कोणालाच अप्रूप नसणार आहे. ज्यावेळी शाळा सुरू होतील त्याचवेळी याचा उपयोग होणार आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक शाळेत लॉकर खरेदीचा प्रस्ताव एक वर्षापूर्वी शिक्षण समितीमध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ही खरेदी झाली आहे. पण या प्रक्रियेत बराच वेळ गेला आहे. विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी एनटीपीसीने सीएसआर फंडातून जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन कोटी निधी वर्ग केला आहे. या फंडातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन शाळांमध्ये प्रयोगशाळा बनविण्याचा प्रस्ताव तयार झाला. पण कोरोना महामारीमुळे ही रक्कम अजूनही खर्ची पडलेली नाही.
दप्तराचे ओझे कमी होणार
झेडपी शाळेत लॉकर उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले. खासगी इंग्रजी शाळांमध्ये असा प्रयोग राबविला जातो. फक्त गृहपाठाच्या वह्या घरी दिल्या जातात. इतर दप्तर शाळेतच ठेवले जाते. त्याप्रमाणे झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना या लॉकरचा उपयोग होणार आहे.