संस्थेचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी उपलेखा परीक्षकाने घेतली दहा हजाराची लाच; सोलापूर 'एसीबी'ची कारवाई
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 24, 2025 09:23 IST2025-04-24T09:22:29+5:302025-04-24T09:23:10+5:30
शिवाजी उंबरजे यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही एसीबीने सांगितले.

संस्थेचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी उपलेखा परीक्षकाने घेतली दहा हजाराची लाच; सोलापूर 'एसीबी'ची कारवाई
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मजूर सहकारी संस्थेच्या विरोधात आलेल्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी सोलापुरातील उप लेखापरीक्षकाने पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हफ्ता म्हणून दहा हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.
शिवाजी गंगाधर उंबरजे (वय ५७, रा. यशवंत हाउसिंग सोसायटी, कुमठा नाका सोलापूर) असे लाच स्वीकारलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बोरामणी (ता. द. सोलापूर) येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्था मर्यादित कार्यरत आहे. तक्रारदार हे त्या संस्थेचे माजी चेअरमन होते. सध्या सदर संस्थेचे चेअरमन हे तक्रारदार यांची पत्नी आहेत. संस्थेचे विरुद्ध सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दक्षिण सोलापूर येथे तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने लोकसेवक उंबरजे यांना संस्थेची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिला होता. सदरचा अहवाल संस्थेच्या बाजूने सकारात्मक पाठविण्यासाठी लोकसेवक उंबरजे यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली, अशी माहिती सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. लोकसेवक शिवाजी उंबरजे यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही एलसीबीने सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे - खराडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस अधीक्षक गणेश कुंभार, पोलिसा अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, राजू पवार, सचिन राठोड, श्याम सुरवसे यांच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा केली.