उपजिल्हा रुग्णालयामुळं ८० गावातील गोरगरिबांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:27+5:302021-03-10T04:23:27+5:30

टेंभुर्णी सोलापूर जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. सन २०११ च्या जनगणनेनुसार टेंभुर्णी शहराची लोकसंख्या १९ ...

Sub-district hospital provides facilities to the poor in 80 villages | उपजिल्हा रुग्णालयामुळं ८० गावातील गोरगरिबांची सोय

उपजिल्हा रुग्णालयामुळं ८० गावातील गोरगरिबांची सोय

googlenewsNext

टेंभुर्णी सोलापूर जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. सन २०११ च्या जनगणनेनुसार टेंभुर्णी शहराची लोकसंख्या १९ हजार होती ती आता ३० ते ३५ हजारांवर पोहोचली आहे. शिवाय टेंभुर्णी औद्योगिक वसाहत व जवळच असलला साखर कारखाना येथील कर्मचारीही टेंभुर्णी शहरातच राहत असल्याने येथील लोकसंख्या ४० हजाराच्या पुढे गेली आहे. या सर्व लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अपुरे पडत होते. आता ग्रामीण रुग्णालयायमुळे ही उणीव भरुन निघणार आहे.

टेंभुर्णी शहर हायवे जंक्‍शन असल्याने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून रात्रंदिवस वाहनांची ये-जा चालू असते. शहरातून जाणारे सर्वच रोड राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची वर्दळ असते.परंतु येथे अद्ययावत रुग्णालय नसल्याने जखमींना शहरातील रुग्णालयात घेऊन जावे लागते. आता उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाल्यामुळे भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. आपदग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळू शकेल.

सध्या टेंभुर्णी शहरात कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधीन ७ उपकेंद्र असून यावर टेंभुर्णी शहर व सभोवतालची ३० गावे अवलंबून आहेत. टेंभुर्णी शहरातील ३५ हजार व ३० गावातील सुमारे ४५ हजार अशा एकूण ८० ते ९० हजार लोकांना आरोग्यसेवा देणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याच्या आधीन ७ उपकेंद्रे यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे येथील जनतेस थोड्याशा गंभीर आजारासाठी इंदापूर, अकलूज, सोलापूर तसेच पुणे येथे जावे लागते.

---

अशी असेल रुग्णोपयोगी सुविधा

विशेष बाब म्हणून शासनाने नुकतेच मंजूर केलेले हे माढा तालुक्यातील पहिलेच उपजिल्हा रुग्णालय आहे. या उपजिल्हा रुग्णालयामुळे टेंभुर्णी शहरासह परिसरातील लोकांना गुणात्मक व दर्जात्मक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी प्रथम दर्जाचा १, द्वितीय दर्जाचे ८ वैद्यकीय अधिकारी तर वर्ग क चे २५ व वर्ग ड चे १३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. शिवाय स्वतंत्र दंत विभाग व स्त्रियांसाठी स्वतंत्र सोय असणार आहे.

रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. रुग्णांसह त्यांच्याबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना राहण्याची सुविधा असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीचे उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे तर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करणे सुलभ व वेळेत होणार आहे. या उपजिल्हा रुग्णालयमुळे टेंभुर्णी शहराच्या वैभवात भर पडणार असून, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

यामुळे प्रश्न लागला मार्गी

टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी जनआंदोलन उभारले होते. या मागणीस पाठिंबा देऊन आमदार बबनराव शिंदे यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला होता. यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: Sub-district hospital provides facilities to the poor in 80 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.