शेतकरी बाजारांसाठी महानगरपालिकेने जागा द्याव्यात : सुभाष देशमुख , सोलापूरात दुसऱ्या आठवडी बाजाराचा शुभारंभ
By admin | Published: April 10, 2017 07:20 PM2017-04-10T19:20:15+5:302017-04-10T19:20:15+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रित निर्णय घेऊन प्रभागनिहाय शेतकरी आठवडा बाजारासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी, उत्पादक कंपन्यांच्या मदतीने सोलापूर शहरात शेतकरी आठवडा बाजार सुरु करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या हितासाठी महानगरपालिकेने विनामूल्य जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे मत सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
सोलापूर शहरातील दुसऱ्या आठवडा बाजाराचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत, महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते सोमवारी नवीन पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे, केशवनगर पोलीस वसाहत मैदानात झाले, यावेळी देशमुख बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी आठवडा बाजारासाठी जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला असून, शेतकरी, उत्पादक कंपन्यांना याकरिता शहरी भागात विनामूल्य जागा मिळतील. यापूर्वीही सोलापूर महानगरपालिकेकडे या बाजाराकरिता जागेची मागणी केलेली होती. जागेचे भाडे जास्त सांगितल्याने आणि तेवढे भाडे शेतकऱ्यांना अदा करणे शक्य नसल्याने उत्पादक ते ग्राहक थेट फळे व भाजीपाला विक्रीची संधी आम्ही देऊ शकलो नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी विनामूल्य जागा देण्याबाबत निर्णय घेतलेला असल्याने आता लवकरच राज्यभर शेतकरी आठवडा बाजार शहरी भागात सुरु केले जातील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक डॉ.भास्कर पाटील यांनी केले. याच्या यशस्वितेसाठी शेतकऱ्यांनी आपला सहभाग वाढविणे महत्त्वाचे असून, थेट विक्रीचा लाभ शेतकऱ्यांनाच होणार आहे. फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी मुंबई शहर उपलब्ध झाले असून, त्याचा लाभ शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ.भास्कर पाटील यांनी यावेळी केले.
--------------------
जागा उपलब्ध करून देणार: महापौर
सोलापूर महानगरपालिकेतर्फे नगरसेवकांची बैठक घेऊन शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आठवडा बाजार उभारणी करणे शक्य आहे अशा जागा कृषी, पणन मंडळास या बाजारासाठी उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच फळ महोत्सवासाठीही जागा उपलब्ध करुन देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून, शेतकऱ्याला आवश्यक मदत करण्यात येईल,अशी ग्वाही महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली़