जनहितच्या आंदोलनाला यश; संत दामाजी व फॕबटेक कारखान्यांवर होणार आरआरसी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 09:41 PM2020-08-21T21:41:20+5:302020-08-21T21:42:08+5:30
साखर सहसंचालकांनी कारवाईचे दिले लेखी आश्वासन; जनहितचे आंदोलन तूर्त स्थगित
मंगळवेढा : साखर सहसंचालकांनी संत दामाजी व फॅबटेक कारखान्यावर आरआरसी कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने जनहित शेतकरी संघटनेचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर असलेले बेमुदत धरणे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक पी.सी दुरगूडे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.
यावेळी प्रभाकर देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, साखर सहसंचालकांनी मागील चार महिन्यांमध्ये संबंधित कारखान्यावर कारवाई का केली नाही. यामध्ये साखर सहसंचालक यांचीही भूमिका संशयास्पद वाटते, याबाबतीत या बेजबाबदार साखर सहसंचालकांची ही चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली आहे.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, भैरवनाथ शुगर व युटोपियन शुगर या कारखानदारांनी सुरुवातीला दोन महिने शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस द्यावा यासाठी वाढीव रकमेसह पैसे दिले व डिसेंबर नंतरच्या ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना मात्र जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी पैसे दिले आहेत हा दुजाभाव शेतकऱ्यांचा बाबतीत का केला? याबाबतीत येत्या दहा-बारा दिवसांमध्ये जर जाहीर केल्याप्रमाणे वाढीव रक्कम उत्पादकांच्या खात्यावरती जमा केली नाही तर जनहित शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे ही सांगितले.
यावेळी उपस्थित रघु चव्हाण, बिरुदेव ढेकळे, बलभीम माळी, पप्पू दत्तू, सुखदेव डोरले, शिवाजी कांबळे, बाळासाहेब नागणे, सर्जेराव गाडे, संजय हणमणे, सुनिल पुजारी , शामराव पुजारी ,सर्वेश्वर शेजाळ, ज्ञानेश्वर पवार, शिवाजी जाधव, हरी चव्हाण, गणपत ढेळे, राहुल पवार, मारुती भोरकडे, सिताराम पाटील, आप्पा भुई तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.