शाळेची पायरीही न चढलेले वडील लेकीसाठी झटले; 'न्यायाधीश' होऊन मुलीनं पांग फेडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:00 AM2019-12-23T11:00:08+5:302019-12-23T11:01:56+5:30
उपळाई खुर्दची अनिता हवालदार हिचे न्यायाधीश परीक्षेत यश
माढा : घरची परिस्थिती हलाखीची, त्यात आई-वडिलांनाही अक्षर ओळख नव्हती़ मात्र त्यांच्या कष्टाच्या प्रेरणेमुळे हे यश मिळाल्याची भावना न्यायाधीशाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या अनिता हवालदार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रवर्ग मुख्य परीक्षा-२०१९ या परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता दादा हवालदार यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेचा निकाल २१ रोजी जाहीर झाला़ त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
घरची परिस्थिती हलाखीची आहे. शिवाय शाळेचा उंबरठादेखील माहीत नसलेले वडील दादा हवालदार यांनी आपल्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत शिक्षण द्यायचे, असा चंग बांधला होता़ माझ्यासाठी त्यांनी अहोरात्र अपार कष्ट केले. त्यांच्या प्रेरणेनेच मला यश मिळवून दिल्याचे अनिता हवालदार यांनी सांगितले.
अॅड. अनिता यांचे प्राथमिक शिक्षण चिखर्डे (ता़ करमाळा) येथे झाले. माध्यमिक शिक्षण उपळाई खुर्द (ता़ माढा) येथील शाळेत तर पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयात लॉ पदवी मिळविली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उपळाई पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
आई-वडिलांची प्रेरणा तर होतीच शिवाय मामा-मामी यांची शिक्षणासाठी मदत झाली. हे यश माझ्या जीवनातील सर्वात आनंद देणारा आहे़
- अनिता हवालदार
परिस्थिती गरिबीची असली तरी मुलांनी शिकून मोठं व्हावं़ आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक करावा़ यासाठी प्रेरणा दिली़ पाठबळ दिले. आपणास शाळेत शिकता आले नाही याची खंत न ठेवता ती उणीव मुलीने भरून काढली़
- दादा हवालदार, वडील