धर्मराज रामपुरे यांची यशोगाथा; सेवानिवृत्तीनंतर ‘ते’ झाले शिल्पकलेचे शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 03:06 PM2019-02-18T15:06:42+5:302019-02-18T15:10:07+5:30
सोलापूर : शिकण्याची जिद्द मनात असली तर कोणत्याही वयात शिकता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कलाशिक्षक धर्मराज रामपुरे. येथील ...
सोलापूर : शिकण्याची जिद्द मनात असली तर कोणत्याही वयात शिकता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कलाशिक्षक धर्मराज रामपुरे. येथील नॉर्थकोट तांत्रिक विद्यालयात विणकाम विभागात शिक्षक असलेले धर्मराज यांनी सेवानिवृत्तीनंतर साठाव्या वर्षी कलेची काशी समजल्या जाणाºया मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्टस्मध्ये प्रवेश घेतला. चार वर्षांचा शिल्पकला डिप्लोमा पूर्ण करून महाराष्ट्रात तिसरे आले. याच जे. जे. स्कूलमध्ये शिकविण्यासाठी त्यांना फेलोशिप मिळाली. सध्या ते तेथील विद्यार्थ्यांना शिल्पकला शिकवितात.
रोजगाराच्या निमित्ताने हे कुटुंब कर्नाटकातून सोलापुरात स्थायिक झाले. आजोबा कापड गिरणीत तर वडील देवेंद्र मिळेल ते काम करून गुजराण करीत असत. वडिलांना भजन, कीर्तनासोबत मूर्तिकलेची ओढ लागली, ती मूर्तिकार शिवाजी गाजूल यांच्यामुळे. लहानपणी धर्मराज आपल्या वडिलांसोबत देवदेवतांची आणि शोभेच्या लहान मूर्ती बनवून सोलापूरच्या रस्त्यावर बसून विकत असत.
नॉर्थकोट प्रशालेतून शिक्षण घेत असताना पेंडसे सरांनी धर्मराज यांची चित्रकला पाहून जे. जे. स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सुचविले, पण गरिबी आड आली. पुढे पेंडसे सरांमुळेच नॉर्थकोटमध्ये विणकाम विभागात शिक्षकाची नोकरी मिळाली. जे. जे.मध्ये शिकण्याची आपली अर्धवट राहिलेली इच्छा लहान बंधू भगवान रामपुरे यांना जे.जे.मध्ये प्रवेश घेऊन १९८२ साली पूर्ण केली. पुढे जे.जे.मध्ये शिक्षणाची संधी मिळाली व संस्थेने फेलोशिप देऊन तिथेच शिकविण्यासाठी नेमणूक केली. साठीनंतर शिक्षण व नोकरीचा त्यांचा हा प्रवास आगळावेगळाच ठरला.
चित्रे काढण्याचा प्रयत्न असा..
घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आई नरसम्मा रेल्वे स्टेशनवर कोळसा उचलण्याचे काम करत असे. शिकत असतानाच यल्ला दासी, एस. एम. पंडित, राजा रवी वर्मा अशा मोठ्या चित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास करीत धर्मराज रामपुरे यांनी चित्रे काढण्याचा प्रयत्न केला.