बळीराजाच्या 'डोळ्यात पाणी'; १० पोते कांदे विकल्यावर मिळाला २ रूपयाचा चेक
By Appasaheb.patil | Published: February 22, 2023 03:08 PM2023-02-22T15:08:05+5:302023-02-22T15:08:45+5:30
राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकर्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सत्ता कोणाचीही असो शेतक-यांच्या पदरी कायमच निराशा पडते. आता तरी शेती करणं अवघडं झालंय. खर्च जास्त अन् उत्पन्न कमी असेच शेतीचे गणित बनत चालले आहे. अर्थसंकल्प असो अथवा निवडणुका फक्त शेतकर्यांना दिलासा देणार्या घोषणांचा पाऊस पडतो अन् पुढे काहीच होत नाही. सध्या कांद्याला मिळणारा भाव कमी झाला आहे, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. असाच एक हताश झालेल्या शेतकर्यांची बातमी सध्या सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे.
राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकर्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते. लिलाव झाला अन् भाव मिळाला. पट्टी तयार करण्यासाठी आडत व्यापार्याने पावती पुस्तक काढले अन् हमाली ४०.४५ रूपये, तोलाई २४.०६ रूपये, मोटारभाडे १५, रोख उचल ४३०, कांद्याचे झाले ५१२ रूपये. या शेतकर्याचा खर्च वजा होता १० पोते कांदे विकल्यावर फक्त २ रूपये ४९ पैसे पट्टी मिळाली. या पट्टीची चिठ्ठी अन् आडत्याने शेतकर्याला दिलेला चेक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्यासमोर पीक करपून जातं. दुसरीकडे शेतात पिकविलेल्या पिकांना याेग्य भाव मिळत नसल्याची खंत अनेक शेतकर्यांनी सोशल मिडियावरच व्यक्त केली आहे.