‘राजा’ला असाही निरोप; प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून काढली श्वानाची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 12:32 PM2021-08-12T12:32:13+5:302021-08-12T12:32:19+5:30
सोलापूर : बाळेतील जोशी गल्लीमध्ये जन्मल्यापासून राहणारा राजा या श्वानाचे अपघातानंतर निधन झाले. त्याच्यावरील प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून अंत्ययात्रा काढली. ...
सोलापूर : बाळेतील जोशी गल्लीमध्ये जन्मल्यापासून राहणारा राजा या श्वानाचे अपघातानंतर निधन झाले. त्याच्यावरील प्रेमापोटी रहिवाशांनी रिक्षातून अंत्ययात्रा काढली. बाळे येथील स्मशानभूमीत त्याला दफन करण्यात आले. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता राजावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवार २९ जुलै रोजी राजा हा रस्त्यावरून जात असताना त्याला ट्रकने उडविले. या अपघातात राजाला गंभीर दुखापत झाली. राजाला मार लागल्यामुळे बाळेतील युवकांनी डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू केले. तब्बल १३ दिवस तो मृत्यूशी झुंजत होता. अखेर मंगळवारी त्याला मृत्यूने गाठले. त्याच्या उपचाराचा खर्चही परिसरातील नागरिकांनीच केला.
राजाचा मृत्यू झाल्याने गल्लीतील अनेकांना आपल्या घरातील सदस्य गेल्यासारखे वाईट वाटले. म्हणून त्याचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून त्याच्या शरीरावर फुले वाहण्यात आली. एका माणसाच्या अंत्यविधीप्रमाणे राजाची अंत्ययात्रा निघाली. रिक्षातून बाळे स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे विधिवत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------
दहा वर्षापासून घरातील सदस्य
मागील १० वर्षापासून राजा हा बाळेतील जोशी गल्लीत वाढला होता. त्याला कुणी पाळल नसले तरी अख्खी गल्लीच त्याचे पालन पोषण करत होती. गल्लीतील इतर श्वानांवर त्याचा धाक होता. त्याने सगळ्यांनाच लळा लावला. त्यामुळे गल्लीतील सर्वांच्याच घरातील एक सदस्य म्हणून त्याच्यावर प्रेम होते.