पांडुरंगाला अशीही 'वंदना'... विठुरायाला भक्ताकडून 19 तोळे सोन्याचा चंदनहार अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:42 PM2022-11-02T13:42:43+5:302022-11-02T13:44:02+5:30
पंढरपूरात आषाढी अन् कार्तिकी एकादशीला भक्तगण येत असतात. भक्तांची मोठा मेळा चंद्रभागेच्या तिरी जमतो
सोलापूर - अवघ्या जगाची माऊली असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची सर्वत्र ख्याती आहे. पंढरपूरची वारीही जगप्रसिद्ध असून वारकऱ्यांच्या या वैष्णवांच्या मेळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही वाहवा केली होती. त्यामुळेच, पंढरपूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील महत्त्वाच्या तिर्थश्रेत्रांपैकी पंढरपूर हे एक आहे. म्हणूनच तिरुपती बालाजीला, शिर्डीच्या साईबाबांना भाविक दानपेटीतून किंवा मनोभावे दान करतात. त्याचप्रमाणे पंढरीलाही भाविक दान करत असतात. नुकतेच एका भाविकाने ११ लाख रुपये किंमतीचा चंदनहार पंढरपूरच्या पांडुरंगासाठी अर्पण केला आहे.
पंढरपूरात आषाढी अन् कार्तिकी एकादशीला भक्तगण येत असतात. भक्तांची मोठा मेळा चंद्रभागेच्या तिरी जमतो. यंदाही कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाला भाविक भक्तांनी, वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. याचदरम्यान, पंढरीच्या मंदिरातील खजिन्यात विविध सोने चांदीच्या दागिन्यांची भर पडली आहे. कल्याण येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे यांनी 11 लाख रुपये किंमतीचा 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार विठुरायाला अर्पण केला आहे. अत्यंत सुबक कलाकुसर असलेला सोन्याचा चंदन हार आज मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झाले असून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिराच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.