गाळप सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील कारखाने साखर आयुक्तांच्या दप्तरी बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:50 AM2018-11-27T10:50:35+5:302018-11-27T10:51:47+5:30
सहकारमंत्र्यांच्या दोन्ही कारखान्यांचा समावेश; ३१ कारखाने सुरू; केवळ २५ कारखान्यांचीच नोंद
सोलापूर: जिल्ह्यातील जवळपास ३१ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असला तरी साखर आयुक्तांच्या दप्तरी २५ कारखान्यांचेच गाळप सुरू झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन्हीही कारखाने अद्यापी सुरू झाले नसल्याचे साखर आयुक्तांच्या दप्तरावरुन स्पष्ट होते.
राज्यात सर्वाधिक ३९ साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा सध्या दुष्काळामध्ये अडकला आहे. या जिल्ह्यातील ३९ पैकी २५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या २५ नोव्हेंबरच्या माहितीवरुन दिसून येते. सुरू असलेल्या २५ साखर कारखान्यांचे २५ नोव्हेंबरपर्यंत ३२ लाख ९० हजार ९२३ मे.टन इतके गाळप झाले आहे. राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे गाळप उच्चांकी आहे.
झालेल्या गाळपातून ३० लाख ४१ हजार ३२० क्विंटल साखर तयार झाली असून उतारा सरासरी ९.२४ इतका पडला आहे. गाळप सुरू असलेल्या २४ कारखान्यांमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, विठ्ठल गुरसाळे, भीमा टाकळी सिकंदर, पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी, मंगळवेढा, आदिनाथ करमाळा, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे, विठ्ठलराव शिंदे, माढा, कूर्मदास, माढा, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील शुगर, सासवड माळी शुगर, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, सिद्धनाथ शुगर तिºहे, जकराया वटवटे,भैरवनाथ शुगर विहाळ, इंद्रेश्वर शुगर, बार्शी, सीताराम महाराज खर्डी,फॅबटेक शुगर, नंदूर, युटोपियन शुगर, कचरेवाडी, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, जयहिंद शुगर, आचेगाव, बबनराव शिंदे शुगर्स, गोकुळ माऊली, विठ्ठल रिफायनरी, करमाळा आदींचा समावेश आहे.
साखर आयुक्तांकडे अद्यापही कारखाने सुरू नसल्याची नोंद असलेल्यामध्ये सिद्धेश्वर, कुमठे, मकाई भिलारवाडी, करमाळा, लोकमंगल अॅग्रो, बीबीदारफळ, लोकमंगल शुगर, भंडारकवठे, मातोश्री लक्ष्मी शुगर, गोकुळ शुगर या सहा कारखान्यांचा समावेश असला तरी हे कारखाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मागील दोन, तीन व त्यापेक्षा अधिक वर्षांपासून शंकर सहकारी, संतनाथ वैराग, सांगोला सहकारी, स्वामी समर्थ अक्कलकोट, आर्यन बार्शी, शेतकरी चांदापुरी, लोकशक्ती, शिवरत्न उद्योग, करकंब हे आठ कारखाने बंद आहेत.
विठ्ठलराव शिंदे राज्यात प्रथम
माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गाळप राज्यात सर्वाधिक म्हणजे ४ लाख ६२ हजार ७०६ मे.टन. इतके झाले असून ४ लाख ५४ हजार ६५० क्विंटल साखर तयार झाली आहे. गाळपात विठ्ठलराव शिंदे राज्यात प्रथम तर १०.२६ उतारा घेऊन श्रीपूरचा पांडुरंग कारखाना राज्यात प्रथम आहे.
गाळप परवाना काहींना मिळाला नसताना सुरू असलेल्या कारखान्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. काहींना परवाना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाळप सुरू असूनही नोंद नसलेल्या कारखान्याबाबत साखर आयुक्तांशी चर्चा करतो.
-डॉ. संजय भोसले, प्रादेशिक सहसंचालक