साखर कारखानदारांची गळचेपी करून भाजपात दिला जातोय प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:11 AM2019-07-27T02:11:15+5:302019-07-27T06:38:10+5:30
सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप: काँग्रेसच्या एकातरी आमदाराने राजीनामा दिला का?
सोलापूर : साखर कारखानदारांची गळचेपी करून भाजपने विरोधी पक्षाच्या आमदारांचे इनकमिंग कार्यक्रम सुरू केला आहे. हे फार काळ टिकणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असून, आठवडयात राजीनामे देतील असे वक्तव्य केले होते. एका तरी आमदाराने राजीनामा दिला का असा असा सवाल करीत शिंदे यांनी पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली.
साखर कारखानदार अडचणीत आहेत. त्यांना संस्था टिकवायच्या आहेत. त्यांची कर्जे नियमित केली जात नाहीत. त्यामुळे आमिष दाखवून त्यांना भाजपात घेतले जात आहे. जे भाजपात गेले त्यांना जी आश्वासने दिली, ती आत्तापर्यंत पूर्ण न झाल्याने अडचणीत आल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत, हे फार काळ टिकणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
अध्यक्षपदी मी नाही इच्छुक
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते असे विचारल्यावर शिंदे म्हणाले की मला याबाबत आत्तापर्यंत कोणीही विचारलेले नाही. माझं नाव कसे चर्चेत आले ते माहित नाही पण इतकी मोठी जबाबदारी मी पेलू शकणार नाही. वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.