सोलापूरची साखर बंगालला, डाळिंबे बिहारला; किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 03:01 AM2021-02-13T03:01:05+5:302021-02-13T03:01:15+5:30
शेतकरी व उद्योजकांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेला सोलापूर विभागात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शेतकरी व उद्योजकांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेला सोलापूर विभागात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या दुधनी मालधक्क्यावरून १ हजार ३२९ टन साखर दनकुनी (राज्य-पश्चिम बंगाल) येथे पाठवण्यात आली आहे
सांगोला, बेलवंडी, जेऊर, बेलापूर, येवलाची केळी, द्राक्षे, कांदा, कडधान्य, चिकू असा एकूण १ हजार २१५ टन माल विक्रीसाठी रवाना पाठवण्यात आला आहे.
रेकॉर्डब्रेक शेतमाल बिहारकडे झाला रवाना
दुधनी मालधक्का येथून १२ फेब्रुवारी रोजी १ हजार ३२९ टन साखर विक्रीसाठी पाठविण्यात आली, तर ३० जानेवारी रोजी सांगोल्यातून रेकॉर्डब्रेक म्हणजे एका दिवसात १ हजार २१५ टनाचा शेतमाल बिहारकडे रवाना झाला.
सांगोला, जेऊर, बेलवंडी, बेलापूर, येवला ते बिहार, दिल्ली आणि बंगाल या लहान स्थानकांमधून डाळिंब, द्राक्षे, केळी, चिकू, कांदा, कडधान्य, लिंबू पाठविण्यात आले.
रेल्वेलाही लाभ
लॉकडाऊनच्या काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने रेल्वेला आर्थिक फटका सहन करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी किसान रेल्वेच्या माध्यमातून देशभर क वस्तूंची वाहतूक सेवा सुरू केली आहे. त्यामुळे किसान रेल्वे प्रशासनाला आणि देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद असताना मालवाहतूक, किसान रेल्वे गाड्यांनी रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर टाकली आहे.
शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीज
मध्य रेल्वेने सुरु केेलेल्या किसान सेवेमुळे शेतक-यांनी उत्पादित केलेला माल देशभरात सर्वदूर पोहचवणे शक्य होत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे यातून चीज होताना दिसत आहे.